सांगली : लक्ष्मी देऊळ-ते कुपवाड रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होत आल्यानंतर पाईपलाईनसाठी तो पुन्हा खोदण्याचा प्रकार ठेकेदारामार्फत घडला. या प्रकाराबद्दल जिल्हा सुधार समितीने संताप व्यक्त करून नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी थांबविण्याची मागणी केली.सांगली-कुपवाड रस्त्यावर लक्ष्मी देऊळ परिसरात रस्त्याचे काम बीबीएम स्तरापर्यंत आले आहे. पूर्णत्वास आलेला हा रस्ता अचानक जेसीबीने उकरण्यास सरुवात केल्यानंतर त्याबाबतची माहिती नागरिकांनी जिल्हा सुधार समितीला दिली.
सुधार समितीचे अॅड.अमित शिंदे यांनी तातडीने याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. शिंदे म्हणाले की, गटारीचे आणि रस्त्याचे काम एकाच ठेकेदाराकडे आहे. तरीही या कामातील गाफिलपणा आणि बेजबाबदारपणा दिसून येतो. सुधार समितीनेच या खराब रस्त्याकडे लक्ष वेधण्यासाठी यापूर्वी खड्ड्यांभोवती रांगोळी काढण्याचे अभिनव आंदोलन केले होते. त्याची दखल घेत या रस्त्याचे काम सुरू झाले होते.स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांनी केवळ हद्दीचे कारण सांगून हे काम करीत नव्हते. अखेर आंदोलनामुळे हे काम मार्गी लागले. काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर ठेकेदाराला गटारीसाठी पाईपलाईन घातली नसल्याचा साक्षात्कार झाला. त्याने तयार झालेला रस्ता पुन्हा जेसीबीने खोदण्याचा प्रकार सुरू केला.
हा सर्व प्रकार नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी करण्यासारखा आहे. त्यामुळे याबाबत ठेकेदाराला जाब विचारणे आवश्यक आहे. आधीच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खर्च केला असताना आता पुन्हा खोदाई करून खर्चात भर टाकण्याचा उद्योग सुरू आहे.
पाईपखाली कोणतेही बेडिंग नसल्याने हा रस्ता कालांतराने पुन्हा खचण्याची चिन्हे आहेत, असे शिंदे म्हणाले. यावेळी शिंदे यांच्यासोबत रवींद्र शिंदे, शकील शेख, अंकुर तारळेकर, सचिन चोपडे, स्वप्नील खोत, यासीन मुलाणी, महालिंग हेगडे, तानाजी रुईकर, महेश हरमलकर, संतोष शिंदे, आसिफ मुजावर उपस्थित होते.असे प्रकार खपवून घेणार नाही!यापूर्वीही रस्ते तयार झाल्यानंतर त्याठिकाणी विविध कामांसाठी पुन्हा खोदकाम केल्याच्या घटना घडल्या आहेत. शासनाच्या म्हणजेच नागरिकांच्या पैशाचा हा दुरुपयोग गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. यापुढे आम्ही असे प्रकार खपवून घेणार नाही. तयार झालेल्या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदार व संबंधित यंत्रणांनी चोखपणे सांभाळली पाहिजे, असे शिंदे म्हणाले.