सांगली : शेतकऱ्यांनी दुधातून अधिकाधिक पैसे मिळविण्यासाठी संकरित गायींची संख्या वाढविली, परिणामी संकरित गायीच्या दुधाचा महापूर आला आहे. देशी गायीचे दूध दुर्मीळ झाले असून आणखी काही वर्षांत संकरित गाईचेच दूध प्यावे लागण्याची चिन्हे आहेत.
पशुसंवर्धन विभाग प्रत्येक पाच वर्षांनी पशुगणना करतो, त्यातून देशी गायीची संख्या लक्षणीय खालावल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१९ च्या पशुगणनेनुसार गाय व बैलांच्या संंख्येत १३ हजारांची घट झाली. देशी गायी नाममात्र उरल्या आहेत. अधिक दुधासाठी शेतकऱ्यांचा कल संकरित गाई पाळण्याकडे आहे.जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांकडे ७० ते २५० संकरित गायींचे गोठे आहेत. परप्रांतीय मजुरांच्या मदतीने पूर्णत: व्यावसायिक तत्त्वावर दूध उत्पादन केले जाते. त्यामुळे संकरित गायीच्या दुधाचा महापूर येत आहे.
म्हशींची संख्या २९ हजारांनी घटली
- पशुधनाच्या वाढत्या खर्चामुळे म्हशींची संख्या कमी झाली आहे. २०१२ मध्ये ४ लाख ९२ हजार ६३३ म्हशी होत्या.
- २०१९ मध्ये ही संख्या ४ लाख ६३ हजार ६० वर आली. २९ हजार २२३ म्हशी कमी झाल्या. वाढत्या खर्चामुळे गोठे रिकामे झाले.
घोडे कमी, गाढवे जास्त
२०१९ च्या गणनेनुसार घोड्यांची संख्या घटली आहे. गाढवे मात्र घोड्यांपेक्षा वाढली. शर्यतबंदीने घोड्यांना बाजाराचे रस्ते दाखविले. २०१२ मध्ये घोडे, गाढवे, शिंगरे, खेचरे यांची संख्या २ हजार ६३३ होती. २०१९ च्या गणनेत गाढवे मात्र वाढल्याचे दिसले.
सर्वांत जास्त पशुधन जत तालुक्यात
जत तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ३ लाख ५५ हजार ९३८ जनावरे आहेत. पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी शेतीवरील अवलंबित्व कमी केले, पशुपालनाकडे लक्ष दिले. तासगाव तालुक्यात १ लाख २५ हजार ४७४ तर वाळव्यात १ लाख ५७ हजार २९५ जनावरे आहेत. मिरजेत १ लाख ४३ हजार ९७३ जनावरे आहेत.
सर्वात कमी पशुधन पलूस तालुक्यात
पलूस तालुक्यात सर्वांत कमी म्हणजे ७३ हजार ९३१ जनावरे आहेत. तालुक्याचे क्षेत्र व शेतकरी संख्या कमी असल्याने जनावरेही कमी आहेत. शिराळ्यात ८१ हजार १६०, खानापुरात ९६ हजार ५३२, कडेगावमध्ये ८१ हजार ९८ जनावरे आहेत. आटपाडीत १ लाख ५० हजार ५१७ जनावरे आहेत.
संकरित गायीचे दूध पाणचट
- संकरित गायीचे दूध पौष्टिक नसल्याने त्याचा दैनंदिन वापर कमी आहे. पाणीदार दुधामुळे गृहिणी नाके मुरडतात.
- संकरित गायीचे दूध वाढावे यासाठी नाना तऱ्हेची इंजेक्शने, औषधांचा मारा केला जातो. सप्लिमेंट्स दिली जातात.
- त्यामुळे संकरित गायीचे दूध काहीसे बेचव लागते. त्याच्यापासून दुग्धजन्य उत्पादनेही चांगल्या दर्जाची तयार होत नाहीत.
जिल्ह्यात पशुधन किती?
गाय, बैल ४९३०००, म्हैस, रेडे ३२४०००, शेळ्या २,००७५४, मेंढ्या ४५४०००, कुत्री ६०१३२, डुकरे ३४१७, घोडे, गाढवे ३०५०