अशोक डोंबाळे ।सांगली : देशात मुबलक साखर असतानाही पाकिस्तानमधून ३० हजार क्विंटल साखर आयात करुन सरकारने सहकारी साखर कारखानदारीचे कंबरडे मोडले आहे. मागील आठवड्यापेक्षा क्विंटलला दोनशे ते तीनशे रुपयांनी दराची घसरण होऊन मंगळवारी साखरेचे दर २४०० ते २५५० रुपयांपर्यंत आले आहेत. यामुळे कारखानदारांबरोबरच शेतकºयांचेही नुकसान झाले आहे. कारखानदारांनी शेतकºयांची दुसºया हप्त्याची सर्वच बिले थांबविल्याचे चित्र सांगली जिल्ह्यात आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा २०१७-१८ वर्षाचा गळीत हंगाम चालू झाला, तेव्हा प्रतिक्विंटल साखरेचा दर ३८०० ते ३६०० रुपये होता. देशात साखरेचे उत्पादन वाढल्यामुळे दराची घसरण चालू होती. कारखान्यांचे गळीत हंगाम संपताच प्रतिक्विंटल साखरेचे दर २८०० ते ३२०० रुपयांपर्यंत होते. या परिस्थितीमध्येच कारखानदारांचा आर्थिक अडचणीतून प्रवास चालू होता. राज्य आणि जिल्हा बँकांनी साखरेचे मूल्यांकनही कमी केल्यामुळे ऊस उत्पादकांचे पैसेही काही कारखान्यांना देता आले नाहीत.
जिल्ह्यातील चार ते पाच साखर कारखान्यांनी गळीत हंगामाच्या शेवटी आलेल्या उसाची बिलेही शेतकºयांना दिली नाहीत. दुसºया हप्त्याची बिले तर सर्वच कारखान्यांनी दिली नाहीत. कारखानदारांच्या आर्थिक कोंडीचा शेतकºयांनाच फटका बसला आहे. शासनाने याकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही. महाराष्ट्रात २०१७-१८ च्या गळीत हंगामामध्ये विक्रमी १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. पूर्वीची शिल्लक साखर असताना, दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानातून ३० हजार क्विंटल साखर आयात केली. साखर आयात केल्याची चर्चा चालू असतानाच महाराष्ट्रातील साखरेचे दर गडगडले आहेत.
मागील आठवड्यात लहान साखरेचे दर प्रतिक्विंटल २६०० ते २६५० रुपये होते. मंगळवार दि. १५ रोजी याच साखरेचे दर प्रतिक्विंटल २४०० ते २४४० रुपये झाल्याचे साखर व्यापारी आणि कारखानदारांनी सांगितले. चांगल्या दर्जाच्या साखरेचे दर आठ दिवसांपूर्वी प्रतिक्विंटल २६५० ते २८०० रुपयांपर्यंत होते. यामध्येही प्रति क्विंटल दोनशे ते तीनशे रुपयांची घसरण होऊन मंगळवार, दि. १५ रोजी २५०० ते २५५० रुपये दर झाले आहेत. पाकिस्तानच्या साखरेने कारखानदार आणि शेतकºयांचे कंबरडेच मोडल्याचे दिसत आहे.
पाकिस्तानातून साखर आयात झाल्यामुळे सांगली जिल्ह्यातील कारखान्यांकडील साखरेची खरेदीही व्यापाºयांनी थांबविली आहे. अनेक कारखान्यांच्या साखर विक्रीच्या निविदांनाही फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे कारखाना व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. हा धोका लक्षात घेऊन तरी सरकारने यापुढे तरी साखरेची आयात थांबवावी.आयात साखरेमुळे डोकेदुखी वाढलीपाकिस्तानची साखर मुंबईत आल्याची बातमी समजल्यापासून व्यापाºयांनी साखर खरेदीकडे दुर्लक्ष केले आहे. दरातही मोठी घसरण चालू आहे. चार दिवसात क्विंटलला दोनशे रुपयांनी दर घसरुन सध्या लहान साखर प्रतिक्विंटल २४०० ते २४४० रुपये आणि मध्यम साखर प्रति क्विंटल २५०० ते २५५० रुपये झाली आहे. साखरेच्या विक्रीतून शेतकºयांची बिले आणि कारखाना व्यवस्थापनाचा खर्च भागविण्याचे मोठे आव्हान आहे, अशी प्रतिक्रिया श्री दत्त इंडिया शुगर कंपनीचे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे यांनी दिली.शेतकरी, कामगारांचा संयम पाहू नये : अरुण लाडदेशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाल्याची सरकारला कल्पना असतानाही पाकिस्तानातून साखर आयात केली. यातून सहकारी साखर कारखानदारी मोडकळीस आणण्याचाच त्यांचा हेतू असल्याचे स्पष्ट दिसत आहे. कारखानदारी मोडकळीस आल्यामुळे शेतकरी, कामगारांवर बेकारीची वेळ येणार आहे. म्हणूनच शेतकरी आणि कामगारांचा आणखी अंत केंद्र आणि राज्य सरकारने पाहू नये, असा इशारा क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी दिला आहे.