मिरज : गणेशोत्सवासाठी फुलांना मागणी असल्याने मिरजेच्या बाजारात फुलांची चांगली आवक आहे. मागणीमुळे फुलांच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. फुलांचा दर तेजीत असल्याने व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.गणेशोत्सवासाठी फुलांना चांगली मागणी असल्याने निशिगंध, झेंडू, गलांडा, लिली, गुलाब या पारंपरिक फुलांसह डच गुलाब, जर्बेरा, कार्नेशिया आदी हरितगृहातील विदेशी फुलांनाही मोठी मागणी असल्याने मिरजेतील बाजारात दर दुपटीने वाढले आहेत.मोठ्या आकारांची मूर्तीं असलेल्या सार्वजनिक गणेश मंडळांसह, घरगुती गणपतींच्या पूजेसाठी विविध प्रकारच्या फुलांना व फुलांच्या हारांना मोठी मागणी आहे. स्थानिक विक्रीसह मिरजेतून सोलापूर जिल्ह्यासह, कोकण, गोवा, कर्नाटकात फुलांची निर्यात सुरू आहे. फुलांच्या दरवाढीमुळे व्यापारी व फूल उत्पादक शेतकरी समाधानी आहेत.मिरजेत दररोज सकाळी भरणाऱ्या फुलांच्या बाजारात खरेदी-विक्रीची मोठी उलाढाल सुरू आहे. फुले महागल्याने हारांच्या दरातही वाढ झाली आहे. किमान १०० रुपयांपासून २५० रुपयांपर्यंत फुलांच्या हारांची किंमत आहे. सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या गणेश मूर्तींसाठीच्या हारांचे दर किमान ५०० रुपयांपासून दोन हजारापर्यंत आहेत. ४० रुपये किलो मिळणारा झेंडू ८० ते ९० रुपये किलो आहे.गणेशोत्सवानंतर दसऱ्याच्या हंगामात पुन्हा झेंडूची दरवाढ होण्याची शक्यता आहे. गणेश पूजनासाठी लाल व पांढऱ्या फुलांना मागणी असल्याने दीडशे रुपये किलो मिळणारा निशिगंध साडे तीनशेवर व ८० रुपये किलो मिळणारी शेवंती २२५ रुपयावर पोहोचली आहे.
फुलांचे वाढलेले दर
- निशिगंध : ३५० रुपये किलो
- झेंडू : ८० रुपये किलो
- गलांडा : १५० रुपये किलो
- गुलाब : ४०० ते ५०० रुपये शेकडा
- जर्बेरा : १२० रुपये पेंडी
- डच गुलाब : १३० रुपये पेंडी
- कार्नेशियन : १२० रुपये पेंडी
उत्पादन घटल्याने दर वाढलेयावर्षी पावसाळ्यात पाऊस जास्त असल्याने फुले मोठ्या प्रमाणात खराब होऊन फुलांचे उत्पादन घटले आहे. उत्पादन कमी असल्याने फुलांचे दर वाढले आहेत. गणेशोत्सवात दर तेजीत असल्याने उत्पादकांना दिलासा मिळाल्याचे व्यापारी अजित कोरे यांनी सांगितले.