सांगली : नवरात्रोत्सवात चांगल्या दराने विकला गेलेला झेंडू आज, मंगळवारी खंडेनवमीला अधिक फुलला. बाजारात २०० ते २४० रुपये प्रतिकिलो दराने त्याची विक्री झाली. तुलनेने उत्पादकांच्या पदरातही चांगले पैसे पडल्याने, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.गणरायाने यंदा झेंडू उत्पादकांवर कृपादृष्टी दाखविल्यानंतर देवीचा नवरात्रोत्सवही पावला आहे. कोरोना काळातही झेंडूला चांगला दर मिळाला होता. मागील वर्षी चांगला दर मिळाल्याने, यंदा जिल्ह्यातील झेंडूचे उत्पादन वाढले आहे. नवरात्रोत्सवात त्यामुळे आवक चांगली झाली. सांगली जिल्ह्यात विविध जातींच्या झेंडूचे उत्पादन केले जाते. जातीनुसार त्यांच्या उत्पादनाची क्षमता ठरलेली असते, तरीही यंदा सरासरी उत्पादन चांगले झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.असा मिळाला दरझेंडूला प्रतिकिलो शेतकऱ्यास ८० ते १२० रुपये मिळाले, तर बाजारातील विक्री २०० ते २४० रुपये प्रतिकिलोने झाली. गुलाबास शेकडा ३०० ते ५०० शेतकऱ्यास तर बाजारातील विक्री ५०० ते ८०० रुपयांनी झाली. पांढरी शेवंती उत्पादकांना प्रतिकिलो १५० ते २०० मिळाले, तर बाजारातील विक्री २४० रुपयांनी झाली. साध्या शेवंतीचा दर बाजारात २०० रुपये किलो होता.जिल्ह्यात ४२६ हेक्टरवर उत्पादन
दर चांगला मिळत असल्याने, यंदा जिल्ह्यात झेंडूची एकूण ४२६ हेक्टरवर लागवड करण्यात आली. मागील वर्षापेक्षा यंदा लागवड व उत्पादन अधिक आहे. झेंडूच्या उत्पादनात सध्या खानापूर व आटपाडी आघाडीवर असून, त्या खालोखाल वाळवा, कडेगाव व मिरज तालुक्यांचा क्रमांक लागतो. दुष्काळी भागातील उत्पादकांनी यंदा उत्पादन वाढविले आहे.
झेंडू व फुलांच्या उत्पादकांना खंडेनवमीला चांगला दर मिळाला आहे. दसऱ्यालाही असाच दर अपेक्षित आहे. सध्या आवकही चांगली झाली आहे. - सतीश कोरे, विक्रेते, मिरज.