इस्लामपूर : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या जनतेचे आशीर्वाद घेत साडेतीन शक्तिपीठाच्या दर्शनासाठी आपल्या शक्ती परिक्रमा यात्रेदरम्यान इस्लामपूर शहरात आल्या होत्या. मात्र, भाजप कार्यकर्त्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे त्यांचा ताफा सरळ कोल्हापूरकडे रवाना झाला. यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या आनंदावर विरजन फिरले. भाजपचे नेते विक्रम पाटील यांनी मुंडे यांना व्हिडीओ कॉल करून स्वागताची तयारी आणि उपस्थित जनसमुदायाचे दर्शन घडविल्यावर मुंडे यांनी हात जोडून सर्वांची माफी मागितली.भाजप नेत्या पंकजा मुंडे या विटा येथील स्वागत स्वीकारून इस्लामपूरकडे येण्यासाठी निघाल्या. उरुण परिसरातील शिवाजी चौकात विक्रम पाटील, महेश पाटील यांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. दुपारपासून सर्वांना मुंडे यांच्या आगमनाची उत्सुकता होती. दिवंगत नगराध्यक्ष अशोकदादा पाटील आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा जिव्हाळा होता. तीच परंपरा विक्रम आणि महेश या बंधूंनी पंकजा मुंडे आणि कुटुंबाशी कायम ठेवली आहे. त्यांच्या स्वागतासाठी मोठे होर्डिंग लावून मुंडे कुटुंबाच्या जिव्हाळ्याच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी स्वागत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जेसीबीवर भलामोठा पुष्पहार आणि दोन जेसीबी मधून पुष्पवृष्टी करण्याची तयारी केली होती. अनेक महिला हातात तबक घेऊन त्यांच्या स्वागतासाठी डोळे लावून बसल्या होत्या.रात्री साडेआठ वाजता पंकजा मुंडे यांचा ताफा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आला. तेथे विक्रम पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे व इतर कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. दोन्ही महापुरुषांना अभिवादन केल्यानंतर समन्वयाअभावी मुंडे यांचा ताफा शिवाजी चौकाकडे न येता सरळ पाेलिस बंदाेबस्तात कोल्हापूरकडे रवाना झाला. त्यामुळे शिवाजी चौकात स्वागताची जय्यत तयारी करून थांबलेल्या जुन्या-जाणत्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. महिलांनीही व्हिडीओ कॉलवर पंकजा मुंडे यांना परत फिरण्याची विनंती केली. मात्र तोपर्यंत मुंडे या कोल्हापूरजवळ पोहोचल्या होत्या. त्यांनी महिलांचीही माफी मागितली.
राजारामबापू कारखान्यावर स्वागत..!पंकजा मुंडे यांनी इस्लामपूर शहरात येण्यापूर्वी वाटेवरील आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील राजारामबापू कारखाना कार्यस्थळावर बापूंच्या पुतळ्यास अभिवादन केले. येथे राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांसह सर्व नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. तेथून त्या शहरात आल्या, मात्र भाजप कार्यकर्त्यांचे स्वागत न स्वीकारताच गेल्याने या घटनेला राजकीय रंग देण्याची चर्चा सुरू झाली होती.