पुनवत : शिराळा तालुक्यातील भातशेतीला पावसाअभावी यंदा जबर फटका बसला आहे. आषाढातही पुरेसा पाऊस नसल्याने भाताच्या उगवण, रोप लागणीवर विपरीत परिणाम झाला आहे.शिराळा तालुक्यात मे-जून महिन्यात भाताच्या पेरण्या झाल्या आहेत. सुरुवातीला पाऊस नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी भात वाफ्यात पाणी सोडून पिकाची उगवण करून घेतली. भुईमूग पेरण्याही उशिरा झाल्या. गेल्या महिनाभरात तालुक्यात पुरेसा पाऊस झाला नसल्याने पिकाच्या उगवण व वाढीवर विपरीत परिणाम झाला आहे.भात या खरीप पिकाला सतत पाऊस व वाफ्यात पाण्याची आवश्यकता असते.आषाढ महिना जास्त पावसाचा महिना म्हणून ओळखला जातो. परंतु सध्या आषाढ निम्मा सरला तरी शिराळा तालुक्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे भाताचे वाफे कोरडेठाक आहेत. पाणवठे, ओढ्या-नाल्यांना पाणी नाही. पीक परिस्थिती समाधानकारक नाही. अधूनमधून केवळ रिमझिम स्वरूपात पाऊस पडत आहे. त्यामुळे पिकात तणांनी जोर केला आहे. शिराळा पश्चिम भागात भाताच्या रोप लागणी खोळंबल्या आहेत. येत्या काही दिवसांत पुरेसा पाऊस झाला नाही, तर भात पिके वाया जाणार अशीच परिस्थिती आहे.
सांगली जिल्ह्यात पावसाअभावी भातशेतीत उगवण, रोप लावणी थांबल्या
By शीतल पाटील | Published: July 05, 2023 5:44 PM