देवराष्टे : कोयना धरणातून पाणी पुरवठा बंद असल्याने कृष्णा नदीतील पाणी पातळी खालावली आहे. परिणामी पाण्याअभावी ताकारी योजना अचानक बंद करण्यात आली.
पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी ताकारी योजनेच्या पाण्यावर विसंबून आहेत. मात्र कोयना पाटबंधारे विभागाने नदी पात्रात पाणी न सोडल्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी खालावली. नदीपात्रात असलेले ताकारी योजनेच्या विद्युत मोटारीचे पंप उघडे पडले आहेत. ताकारी पाटबंधारे प्रशासनाने कोयना पाटबंधारे विभागाशी पाणी सोडण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. मात्र धरणातील पाणीसाठा कमी असल्यामुळे पाणी सुटण्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
ताकारी योजना पूर्ववत चालू करण्यात येणार
कोयना धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवल्यास शेतीसाठी पाणी मिळणे अवघड होणार आहे. तरीही शासनाने नदीपात्रात पाणी सोडल्यास ताकारी योजना पूर्ववत चालू करण्यात येणार असल्याची माहिती ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिली