विकास शहाशिराळा : वाकुर्डे बुद्रुक (ता. शिराळा) येथील करमजाई देवी मंदिरासमोर वाकुर्डे योजनेच्या पडवळवाडी ते मानकरवाडीपर्यंत असणाऱ्या १० किलोमीटर अंतरातील खुल्या कालव्याला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. परिणामी उताराच्या बाजूची सुमारे ५०० एकर शेतजमीन नापीक झाली आहे. याचा फार मोठा फटका या भागातील शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे या संतप्त शेतकऱ्यांनी बळीराजा शेतकरी संघटनेचे बी. जी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्राणांतिक उपोषणास सुरुवात केली आहे.शेतकऱ्यांनी यापूर्वी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांना निवेदन दिले होते. २०१७ पासून या भागातील शेतकरी शासन आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दाद मागत आहेत; मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद या व्यवस्थेकडून मिळालेला नाही. पडवळवाडी, नळवा वस्ती, माळ वस्ती, नारजी वस्ती, तरसे वस्ती, रामोशी वस्ती, पारगावकर वस्ती, धाकली अंत्री, जोतिबा मंदिर ते मानकरवाडी या परिसरातील कालव्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने हे शेतकरी गेल्या ७ वर्षांपासून याचा पाठपुरावा सुरू केला आहे; मात्र त्यांच्या या प्रश्नाकडे शासनाने कानाडोळा केला आहे. त्यामुळे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे कालव्यातून प्रचंड प्रमाणात पाण्याची गळती होऊन कालव्याशेजारी उताराला असणाऱ्या ५०० एकर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना कोणतेही पीक घेता येत नाही. धूळवाफेने भाताची पेरणी होत नाही. कालव्यासाठी ज्या जमिनी गेल्या त्याचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.उपोषणात शिवाजी शेटके, दगडू शेटके, वसंत शेटके, नाथाभाऊ शेटके, निवृत्ती शेटके, जगन्नाथ शेटके, कृष्णा शेटके, हणमंत माने, भाऊसाहेब जाधव, गोरख शेटके, बाळू शेटके, प्रकाश शेटके, हनुमंत माने, रघुनाथ सावंत, रंगराव पाटील, श्रीरंग सावंत, लक्ष्मण शेटके, साधू शेटके, राजाराम पडवळ आदी सहभागी झाले आहेत. जलसंपदाचे उपकार्यकारी अभियंता कमलाकर सूर्यवंशी, सहायक पोलिस निरीक्षक अनिता मेणकर, उपअभियंता गुरू महाजन या अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली.
अशा आहेत मागण्याकालव्याचा भराव शेतकऱ्यांच्या हद्दीत पडला असल्यास त्या क्षेत्राची आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, ज्यांच्या चुकीमुळे भराव पडला, त्यांच्या पगारातून, ठेकेदाराच्या संपत्तीतून भरपाई वसूल करून द्यावी. तसा अहवाल महिन्याभरात मिळावा. कालव्याचे दगडी बांधकाम, काँक्रीट अस्तरीकरण, लायनिंग, बेडकाँक्रीट यामध्ये ५० मायक्रॉन २२० पॉलिथिन पेपर वापरलाच नाही, त्याचे पंचनामे व्हावेत. लोखंडी गेट, कालव्यात चुकीच्या घातलेल्या सिमेंट पाईप आणि त्यावरील भराव व रस्ता यांचाही दर्जा चांगला नाही. ठेकेदार व संबंधित सर्व अभियंते, गुणवत्ता नियंत्रक यांचे संगनमत आहे. त्या सर्वांना जबाबदार धरून त्यांची चौकशी करावी. अवैध मार्गांनी मिळवलेली संपत्ती जप्त करून फौजदारी कारवाई करावी. ठेकेदारांना काळ्या यादीत समाविष्ट करावे.