सदानंद औंधे
मिरज : मिरजेतील गणेशोत्सवात शिवसेनेतर्फे उभारण्यात येणाऱ्या स्वागत कमानीवर शिवसेना शिंदे व ठाकरे गटाने दावा केल्याने प्रशासनाने दोघांनाही परवानगी दिलेली नाही. याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा सोमवारपासून कमान उभारणीस सुरुवात करण्याचा इशारा शिंदे गटाने दिला आहे. त्यातच ठाकरे गट कमानीवर चाळीस गद्दारांचा देखावा करणार असल्याने मिरजेत शिंदे-ठाकरे गटात वाद पेटण्याची चिन्हे आहेत.गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर उभारण्यात येणाऱ्या उंच व भव्य स्वागत कमानी हे मिरजेच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. मिरवणूक मार्गावर शिवसेनेसह विविध पक्ष संघटनांच्या १७ लहान-मोठ्या स्वागत कमानी उभारण्यात येतात. कमानीवर विविध देखावे साकारण्यात येतात. गतवर्षी शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाने मार्केट परिसरात उभारण्यात येणाऱ्या स्वागत कमानीवर दावा केल्याने दोन्ही गटांत वाद झाला होता. मात्र प्रशासनाने मध्यस्थी करून ठाकरे गटाला कमान व त्यासमोर शिंदे गटाला स्वागत कक्ष उभारण्यास परवानगी देत हा वाद मिटविला होता. मात्र आता शिवसेना कोणाची? या वादावर न्यायालय व निवडणूक आयोगाने निर्णय दिल्याने स्वागत कमानही आमचीच, असा शिंदे गटाचे शहरप्रमुख किरण रजपूत यांचा दावा आहे.शिंदे व ठाकरे गटाने या वर्षी शिवसेनेची स्वागत कमान उभारण्याच्या परवानगीसाठी पोलिस व महापालिकेकडे अर्ज केला आहे. मात्र एकाच जागी दोघांनी कमानीसाठी परवानगी मागितल्याने महापालिकेने पोलिसांकडे अभिप्राय मागितला आहे. वाद मिटेपर्यंत शिवसेनेच्या स्वागत कमानीस परवानगी मिळणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. दोन्ही गटांचा दावा असल्याने स्वागत कमान कोणाची, या वादावर तोडगा काढण्यासाठी पोलिस, महापालिका व तहसीलदार एकत्र बैठक घेऊन याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले.शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांनी स्वागत कमानीच्या वादाबाबत प्रशासन निर्णय घेणार असल्याचे सांगितले. विसर्जन मिरवणुकीला विलंब होत असल्याने कोणत्याही नवीन कमानी व स्वागत कक्षाला परवानगी देण्यात येत नाही. मात्र आता स्वागत कमानीच्या वादात सत्ताधारी मंत्रीही फोनाफोनी करीत असल्याने प्रशासनाचीही अडचण झाली आहे. शिंदे गटाचे शहरप्रमुख किरण रजपूत यांनी प्रशासनाने याबाबत निर्णय न घेतल्यास सोमवारपासून कमान उभारणार असल्याचे सांगितले.
ठाकरे गटाचीच कमान : रजपूतशिवसेना ठाकरे गटाची स्वागत कमानीची परंपरा आहे. पोलिस व प्रशासनाने यापूर्वी आम्हालाच कमानीची परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून परवानगी मिळाली नाही तरीही कमान उभारण्यासाठी संघर्षाची तयारी असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख विशाल रजपूत यांनी सांगितले.
परवानगी मिळणार का?शिंदे गटाच्या स्वागत कमानीवर छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमा आहेत. ठाकरे गटाच्या स्वागत कमानीवर चाळीस गद्दारांचे व्यंगचित्र आहे. ठाकरे गटाला स्वागत कमानीची परवानगी मिळाल्यास गद्दारांच्या देखाव्यास परवानगी मिळणार का? याबाबत उत्सुकता आहे.