अशोक डोंबाळेसांगली : सोनसळ (ता. कडेगाव) येथे चार महिन्यांपूर्वी घरगुती सिलिंडरचा स्फोट होऊन पती, पत्नीसह त्यांची दोन मुले जखमी झाले. जखमी मुलांची आई ज्योती अंकुश कदम (वय ३६) यांचे उपचारावेळी निधन झाले, त्यानंतर दहा दिवसात वडील अंकुश यांचेही निधन झाले. उपचार घेताना बहिण-भावंडांना त्याची कल्पनाही नव्हती. घरी परतल्यानंतर भकास निराधारपणाचे आयुष्य त्यांची प्रतीक्षा करीत होते. जवळचे कुणी नातेवाईक नसल्याने आता शेजारच्या लोकांनी माणुसकीचे दर्शन घडवित पोटा-पाण्याची व्यवस्था केली, पण त्यांच्या भविष्याचा प्रश्न अद्याप अधांतरीच आहे.पोरके झालेल्यांमध्ये मुलगी सोनाली (वय १८), मुलगा अभिराज (वय १५) अशी त्यांची नावे आहेत. या मुलांची करुण कहाणी कल्पनेपलिकडची आहे. एका सिलिंडरच्या स्फोटामुळे हसण्या-खेळण्याच्या वयातच सोनाली आणि अभिराजवर दु:खाचा डोंगर कोसळला. सोनसळमध्ये चार महिन्यांपूर्वी घरगुती सिलिंडरचा स्फोट होऊन पती-पत्नीसह त्यांची दोन्ही मुले गंभीर जखमी झाली. पती-पत्नीचे निधन झाले. त्यांची दोन्ही मुले उपचारानंतर बरी झाली; पण, आजही त्यांच्या अंगावर आणि मनावर झालेल्या जखमा आणि वेदना तितक्याच गंभीर आहेत. जखमेच्या वेदनांपेक्षाही आई-बाबांचे छत्र हरपल्याची आणि त्यानंतर संघर्षात जगत असलेल्या दोघा मुलांची वेदना हृदय पिळवटून टाकणारी आहे.दोघांचे वडील अंकुश हे त्यांच्या कुटुंबात एकुलते वारस होते. आजीचे निधन झाले असून आजोबा हयात आहेत. अंकुश हयात असताना त्यांचे वडिलांबरोबर भांडण झाल्यामुळे ते कऱ्हाडला मुक्कामी आहेत. सोनाली आणि अभिराज यांच्या आजोळच्या लोकांनी रुग्णालयाचा खर्च केला. अंकुशमुळे आपली मुलगी गेली, म्हणून तेही पुन्हा सोनसळला फिरकलेच नाहीत, असे तेथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे ज्या घरात सिलिंडरचा स्फोट झाला, तेथेच आई-बाबांचे छत्र हरपलेली निराधार दोन भावंडे स्फोटाच्या जखमा घेऊन विव्हळत एक एक रात्र ढकलत आहेत.
शेजारी धावले, तरीही प्रश्न कायमनातलगांनी झिडकारले तरी शेजारी मात्र हिंमत हरले नाहीत. तेच या निराधार भावंडांची काळजी घेत आहेत. सोनाली बारावीत आणि अभिराज नववीमध्ये शिक्षण घेत आहे. सध्या त्यांचे शिक्षण थांबले आहे. आरोग्याचा प्रश्न अजून संपलेला नाही. शेजाऱ्यांच्या मदतीलाही मर्यादा असल्याने त्यांना दानशुरांच्या मदतीची आणि मायेची साथ हवी आहे.
अजूनही माणुसकी जिवंत आहेसोनाली आणि अभिराजच्या दु:खाची कल्पना सामाजिक कार्यकर्ते विश्राम कदम यांच्यापर्यंत पोहोचली. लगेच त्यांनी या मुलांना न्याय देण्यासाठी राज्य शासनाकडे प्रयत्न चालू केले आहेत. या मुलांच्या शिक्षण आणि आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ते पुढाकार घेत आहेत. पण, फारशी कुणाची मदत होत नसल्याची खंत कदम यांनी व्यक्त केली.