सांगली : लोहमार्गांच्या दुहेरीकरणाची कामे सुरु असल्याने निजामुद्दीन-गोवा एक्स्प्रेससह काही गाड्या सातत्याने विलंबाने धावत आहेत. गोवा एक्स्प्रेसची सांगलीत येण्याची वेळ रात्री १० वाजता आहे. चार दिवसांपूर्वी ती चक्क पहाटे तीन वाजता आली. प्रवाशांनी तिकीट रद्द करणे पसंत केले, तर काही प्रवाशांनी स्थानकातच पहाटेपर्यंत झोप काढली. मंगळवारी रात्री ती अडीच तास उशिरा आली.सांगली-पुणेदरम्यान वाल्हे स्थानकाजवळ दुहेरीकरणाची कामे सुरु आहेत, तर दौंडजवळही ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे एक्स्प्रेसला विलंब होत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. गुरुवारी (दि. १९) रात्री ही गाडी सांगलीमार्गे रद्द करण्यात आल्याचे सांगलीचे स्थानक अधीक्षक विवेककुमार पोद्दार यांनी सांगितले. या महिन्याअखेरपर्यंत गोवा एक्सप्रेसचे वेळापत्रक विस्कळीतच राहण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून सांगली, कोल्हापूर व दक्षिणेकडे धावणाऱ्या अन्य काही गाड्यांचे वेळापत्रकही अंशत: विस्कळीत झाले आहे.
दुहेरीकरणाच्या कामामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, निजामुद्दीन-गोवा एक्स्प्रेसला विलंब
By संतोष भिसे | Published: October 18, 2022 5:38 PM