अंकलखोप : येथील म्हसोबाच्या बनातील इतिहासकालीन बादशाही जात्याने भाविकांच्या मनात देवत्व प्राप्त केले आहे. म्हसोबाच्या दर्शनानंतर भाविक हमखास या अगडबंब जात्याचे दर्शन घेतात. गुलाल, साखरभात अर्पण करून श्रद्धा प्रकट करतात.इतिहासाचे अभ्यासक महेश मदने यांनी याविषयी अधिक माहिती दिली. अंकलखोपला चालुक्य सम्राट विक्रमादित्य याच्या कारकीर्दीतील इसवी सन १०७७ मधील जैन शिलालेख सापडला आहे. हजारो वर्षांच्या इतिहासाचे साक्षीदार असणारे अंकलखोप अनेक ऐतिहासिक गुपिते सोबत बाळगून आहे. चिंचबनातील म्हसोबा देवस्थान महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. कैकाडी, बेलदार, माकडवाले, खोकडवाले तसेच इतर बहुजनांचे कुलदैवत आहे. दर अमावास्येला हजारो भाविक म्हसोबा चरणी माथा टेकण्यासाठी गर्दी करतात. जणू छोटी यात्राच असते.याच बनात म्हसोबासमोर बादशाही जाते आहे. मंदिरासमोरील दीपमाळेशेजारी इतिहासाचा हा बहुमोल साक्षीदार पहुडला आहे. ही भलीमोठी शिल्पकृती पाहणाऱ्याचे लक्ष वेधून घेते. इतिहासकाळापासून धान्य दळण्यासाठी त्याचा वापर होत आला आहे. घरातील जाते साधारणत: दोन ते चार फूट व्यासाचे असते. एका-दोघा व्यक्तींच्या मदतीने वापरता येते. ते बादशहाच्या काळातील असून सैन्यासाठी धान्य दळण्याचे काम त्यावर केले जायचे, असे जुन्या पिढीतील ग्रामस्थ सांगतात. बादशहाच्या सैन्याचा तळ येथे होता, त्यावेळी जात्याचा वापर केला जायचा. सैन्यदलाने मुक्काम हलविल्यानंतर जाते येथेच सोडून दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. जाते आजही अत्यंत सुस्थितीत आहे.
देवाच्या साथीने मिळाले देवपणम्हसोबाच्या सान्निध्यात राहिल्याने दगडी जात्यालाही देवपण मिळाले आहे. म्हसोबाचे दर्शन घेतल्यानंतर भाविक बादशाही जात्यालाही नमस्कार करतात. पूजाअर्चा करतात. अगरबत्ती, नैवेद्य अर्पण करतात. भलेमोठे जाते पाहून तोंडात बोटे घालतात.पाळ्या चार फुटांहून अधिक व्यासाच्या
बादशाही जात्याच्या पाळ्या चार फुटांहून अधिक व्यासाच्या आहेत. उंची सुमारे दीड फुटांहून अधिक आहे. घास घालण्यासाठी मुखाचा व्यासही फूटभर आहे. वरच्या पाळीवर खुंट ठोकण्यासाठी चार गोलाकार व दोन चौकोनी जागा आहेत. संपूर्ण पाळीवर सुंदर नक्षीकाम आहे.