सांगली : सकल मराठा क्रांती मोर्चाने बंद जाहीर केल्याने सांगलीतील बाजारपेठा गुरुवारी दिवसभर पूर्णत: बंद राहिल्या. त्यामुळे सुमारे २५० कोटींची व्यापारी उलाढाल बंद राहिली.गणपती पेठ, सराफ बाजार, कापड पेठ, बाजार समितीसह महत्वाच्या बाजारपेठा आज सुरुच झाल्या नाहीत. व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे एकही व्यापारी पेढी उघडली नाही. हॉटेल संघटना, किराणा व्यापारी संघटना, बाजार समितीतील व्यापारी, गणपती पेठेतील घाऊक व्यावसायिक, इलेक्ट्रीक व इलेक्ट्रॉनिक व्यापारी संघटना, पानपट्टी असोसिएशन यांनी बंदला पाठिंबा दिला होता. भाजी मंडईतही दिवसभर शुकशुकाट होता. शिवाजी मंडई, जुनी मंडई येथे विक्रेत्यांनी व्यापार बंद ठेवला. हरभट रस्ता, मारुती रस्ता बसस्थानक रस्ता, पंचमुखी मारुती रस्ता आदी परिसरात सर्व दुकाने बंद राहिली.गुरुवारी बंद जाहीर केलेला असल्याने जिल्हाभरातून व्यापारी व खरेदीदार सांगलीला आले नाहीत. अन्य सर्व तालुक्यांतही बंद असल्याने व्यापाऱ्यांना पूर्ण विश्रांती मिळाली. एरवी दिवसभर गजबजलेली गणपती पेठ बंदमुळे आज शांत होती. सराफ कट्ट्यामध्येही १०० टक्के बंद पाळण्यात आला.शहरातील व्यापारी उलाढाल बंद राहिल्याने सुमारे २५० कोटींची उलाढाल थंडावली. सायंकाळी सहानंतर किरकोळ स्वरुपात दुकाने टप्प्याने उघडण्यात आली.
व्यापारी संघटनेने बंदला पूर्ण पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे शहरात एकही दुकान उघडले नाही. मराठा क्रांती मोर्चाच्या आरक्षणविषयक मागणीला व्यापाऱ्यांनी पूर्ण सहमती दर्शविली. - समीर शहा, व्यापारी संघटना.