सांगली : जिल्ह्यात बुधवारी रात्रभर पडलेल्या पावसाने ७० हजार एकरवरील द्राक्ष बागांचे नुकसान झाल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. कृषी विभागाने तातडीने नुकसानीचे पंचनामे सुरु केले आहेत. एका रात्रीत झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या बागा वाचविण्याच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे.जिल्ह्यात मिरज, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, खानापूर, पलूस, कडेगाव, तासगाव, वाळवा, शिराळा तालुक्यात बुधवारी रात्रभर व गुरुवारी सकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ऑक्टोबर छाटणीच्या व फ्लॉवरिंगच्या द्राक्ष बागांना मोठे नुकसान सोसावे लागले. ७० ते ८० टक्के द्राक्षबागांना फटका बसल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. नुकसानीचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.जिल्ह्यासह सांगली, मिरजेलाही मुसळधार पावसाने झोडपले. गुरुवारी दुपारनंतर पावसाने उघडिप दिली. अद्याप ढगाळ वातावरण कायम असून शनिवारपासून आकाश निरभ्र होण्याचा भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे. तोपर्यंत ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.द्राक्षबागायतदार हादरलेगेल्या काही दिवसांपासून हलक्या स्वरुपाचा पाऊस असल्याने द्राक्षबागा जगविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून सुरु होता, मात्र बुधवारी रात्रीच्या पावसाने त्या प्रयत्नांना दणका दिला. बुधवारी सकाळपर्यंत जिल्ह्यातील द्राक्षबागांचे ४० टक्के नुकसान नोंदले होते. बुधवारी रात्रीच्या पावसानंतर हे नुकसान ७० ते ८० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे, असे द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष संजय बरगाले यांनी सांगितले.ऊसतोडण्या पुन्हा थांबल्याजिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने उसाच्या शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे ऊसतोडण्या पुन्हा थांबल्या आहेत. अजून तीन ते चार दिवस हे पाणी निघणार नसल्याने कारखान्यांची व शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.कृषी विभागाकडून तातडीने पंचनामेकृषी विभागाने तातडीने गुरुवारी पंचनामे सुरु केले असून नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेण्यात येत आहे. जिल्ह्यात द्राक्षाचे एकूण सव्वा ते दीड लाख एकर क्षेत्र असून यातील ७० ते ८० हजार एकर बागांचे नुकसान झाल्याचा द्राक्ष बागायतदार संघाचा अंदाज आहे.
अवकाळीचा फटका; सांगलीत ७० हजार एकरावर द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्याचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2021 2:25 PM