यड्राव : कोंडिग्रे (ता. शिरोळ) येथील गायरानातील वनविभागाच्या अखत्यारीतील मुरूम चोरी सुरू आहे. सुमारे पंधरा ते वीस डंपर मुरूम नेल्याचे स्पष्ट झाले असून, ग्रामस्थांनी पोलीस पाटलांसमक्ष विरोध केला. मात्र, त्यांनी बघ्याची भूमिका घेतली, तर तलाठी यांनीही दुर्लक्ष केले. यामुळे मुरूम नेणारे जेसीबी व दोन डंपर मुरुमासह पसार झाले. कोंडिग्रे येथील जमिनीमधून काल, बुधवारपासून एक जेसीबी व दोन डंपरच्या साहाय्याने मुरूम उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. आज, गुरुवारी सकाळी सात वाजता पुन्हा दोन डंपर व एक जेसीबी मशीन मुरूम वाहतुकीसाठी आल्याने ग्रामस्थ गोळा झाले. तोपर्यंत दोन डंपर मुरूम भरण्यात आला होता. मुरूम उत्खनन करण्यास ग्रामस्थांनी विरोध केला.ग्रामस्थांनी ही घटना तलाठी डी. एस. पाटील याना कळविली; परंतु घटनास्थळी येण्यास त्यांनी असमर्थता दर्शविली. पोलीसपाटील सतीश कांबळे हे घटनास्थळी होते; परंतु त्यांनी कोणतीही कारवाई न केल्याने मुरुमासह डंपर व जेसीबी पसार झाले. यावेळी सरपंच कल्लाप्पा मगदूम, धनपाल कुंभार, सुनील कामत, इचलकरंजी नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी पी. एल. हणबर, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
ग्रामस्थांमुळे मुरूम चोरी उघडकीस
By admin | Published: December 11, 2014 10:58 PM