खरसुंडी ,दि. ११ : नाम फौंडेशनचे कार्य म्हणजे माणसांनी माणसांसाठी चालविलेली माणुसकीची चळवळ असून, यामध्ये राजकारणास कुठेही थारा नाही, असे स्पष्ट मत नाम फौंडेशनचे संस्थापक सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे व्यक्त केले.
नाम फौंडेशन आणि आटपाडी तालुका पत्रकार संघ यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून उभारलेल्या कामामुळे माणगंगा नदीपात्रातील पाणी पूजन कार्यक्रम आयोजित केला होता, याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी नाम फौंडेशनचे गणेश थोरात, गोपीचंद पडळकर, पंचायत समिती सभापती हर्षवर्धन देशमुख, प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, दिघंचीचे नूतन सरपंच अमोल मोरे प्रमुख उपस्थित होते.
अनासपुरे म्हणाले, दिघंची गावातील स्थानिक पुढारी नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून विकासाच्या मुद्यावर पुढे येऊन जनशक्ती उभी करावी. युवकांनी राजकारण बाजूला ठेवून समाजकार्यात सक्रिय व्हावे. परिसरात वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात करावी, तसेच नदीकाठी घाट बांधून सुशोभिकरण करावे.
किशोर पुजारी, पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी, नंदकुमार गुरव, अॅड. विलास देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास जि. प. सदस्य अरूण बालटे, गणेश जाधव यांच्यासह कार्यकर्ते आदी यावेळी उपस्थित होते.