गजानन पाटील ।संख : जत तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरी, कूपनलिका, तलाव, बंधारे कोरडे पडले आहेत. पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अवकाळी पावसाने दडी दिली आहे. त्यामुळे पूर्व भागातील ४० टक्के द्राक्षबागांची खरड छाटणीची कामे पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने रखडली आहेत. परिणामी यावर्षी द्राक्ष उत्पादनात घट होणार असून बागायतदार आर्थिक अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.
तालुक्यात ५ हजार हेक्टर क्षेत्रावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत उजाड अशा फोंड्या माळरानावर शेतकऱ्यांनी द्राक्षबागा उभ्या केल्या आहेत. कृषी विभागाच्या अनुदानावर व स्वत: शेततळी बांधून द्राक्षबागा जगविण्याची धडपड शेतकरी करत आहे. बागांची खरड छाटणी घेऊन मे महिन्यात काडी तयार करावी लागते. पुरेसे पाणी उपलब्ध झाले नाही, तर काडी अपरिपक्व तयार होणे, तसेच त्यांच्या गर्भधारणेवर परिणाम होतो. यामुळे पुढे उत्पादन घटण्याचा धोका निर्माण होतो. पाणीच नसल्याने खरड छाटणी झालेली नाही.
मे महिन्यात अवकाळी पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शेतकरी द्राक्ष बागांना टँकरने पाणी घालत आहेत. परंतु टँकर भरण्याला सुद्धा पाणी मिळेनासे झाले आहे. त्याचेही दर वाढल्याने टँकरचे पाणी परवडत नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.मजुरांना रोजगार : नाहीद्राक्षबागेसाठी दरवर्षी मे महिन्यात छाटणी करणे, खुडा काढणे, पेस्ट लावणे, डॉरमिक्स लावणे, बेदाणा शेडला टाकणे, बेदाणा झाडणे व इतर कामांसाठी मजुरांची आवश्यकता असते. मजुरांना रोजगाराची संधी मिळते. मजुरीही जास्त मिळते. पण यावर्षी पाण्याअभावी खरड छाटणी झाली नाही. त्यामुळे मजुरांना रोजगार नाही.
पाणीच नसल्याने खरड छाटणी झालेली नाही. पाण्याविना बागा वाळून जाणार आहेत. शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. शासनाने कर्जमाफी करावी, कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करावे, अशी आमची मागणी आहे.- ओग्याप्पा तोदलबागी, भिवर्गीजत पूर्व भागातील द्राक्षबागांची पाण्याअभावी खरड छाटणी झालेली नाही. फक्त खोड आहेत.