पळशी : दूरच्या प्रवासाने थकल्याभागल्या प्रवाशांना सावली देणारी प्रसिद्ध अशी शेकडो वर्षांपूर्वीची पळशी, ता. माण येथील वाण्याची झाडी महामार्गाच्या रुंदीकरणात तोडल्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. येथील रस्त्याकडेला दुतर्फा उभी असलेली मोठी झाडे ही ‘वाण्याची झाडी’ म्हणून ओळखली जात होती. सातरा-पंढरपूर रस्त्याच्या रुंदीकरणात झाडे तोडल्याने ‘वाण्याची झाडी’ आता नामशेष झाली आहे.
सातारा-पंढरपूर या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम जलदगतीने सुरू असल्याने या मार्गावरील प्रवास जलदगतीने व सुखकर होणार आहे. त्यामुळे एका बाजूला लोकांकडून समाधान व्यक्त केले जात असलेतरी या रस्त्यासाठी मात्र, कडेच्या शेकडो झाडांची बेसुमार कत्तल केली जात आहे. त्यामुळे रस्त्यावर बकाल स्वरूप पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूच्या रुंदीकरणासाठी झाडांची कत्तल करण्यात आली आहे. यामुळेच माण तालुक्यातील पळशी येथील वाण्याच्या झाडीची ओळख पुसली आहे.