लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे. अशात सांगलीच्या शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प वर्षभरापासून रखडला आहे. हा प्रकल्प तातडीने सुरू करावा, यासाठी बुधवारी मदनभाऊ युवा मंचच्यावतीने प्रकल्पाला शेणाच्या गोवऱ्या थापत अनोखे आंदोलन करण्यात आले.
युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. लेंगरे म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजन मिळत नाही म्हणून लोकांनी जीव गमावला आहे. सांगली सिव्हिलमधील ऑक्सिजन प्रकल्प वर्षभरापासून कार्यान्वित केला नाही. याला जबाबदार कोण? किरकोळ कामाअभावी तो अपूर्ण आहे. हा प्रकल्प सुरू असता, तर जिल्ह्याला ऑक्सिजनची मोठी मदत झाली असती. ठेकेदाराला ७० टक्केपर्यंत पैसे देऊनही प्रकल्प पूर्ण झालेला नाही.
सांगली शहराला कोणी वाली आहे का नाही, असा प्रश्न जनता विचारत आहे. खासदार, आमदारांनी बघ्याची भूमिका घेतली आहे. ऑक्सिजन प्रकल्प भंगारात घालणार आहात की, त्यावर शेणाच्या गोवऱ्या थापणार आहात, असा सवालही केला. हा प्रकल्प तातडीने सुरू करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.