सहदेव खोतपुनवत : ग्रामीण भागात घरबांधणीमध्ये सातत्याने वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून जुन्या धाटणीच्या घरांच्या जागी अत्याधुनिक सोयी सुविधांची घरे उभारली जात आहेत; मात्र ग्रामीण गावगाड्यात टिकाऊ अशा पांढऱ्या मातीपासून बनवलेली घरे अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहेत. विशेष म्हणजे शेकडो वर्षे होऊनही ही घरे, वाडे सुस्थितीत आहेत. याचे वैशिष्ट्य म्हणजे ही घरे पर्यावरण पूरक असून उन्हाळ्यात या घरांमध्ये वातावरण थंड राहण्यास मदत मिळते.
ग्रामीण तसेच शहरी भागात सध्या सिमेंटची जंगले वाढत आहेत; पण तरीही दुसरीकडे ग्रामीण भागात जुन्या काळात बांधलेली घरे, चिरेबंदी वाडे, अजूनही लक्षवेधक ठरत आहेत. ग्रामीण भागात जुन्या काळात पांढऱ्या मातीच्या विटापासून बनवलेली घरे, वाडे आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत. जुने लोक सांगत असलेल्या माहितीनुसार, ही पांढरी माती नदीभागात तयार केली जायची. पाणथळ जमिनीत उभी व आडवी चर खोदून पावसाळ्यात पाण्याबरोबर वाहून आलेली सामान्य माती साठवून ती चाळून घेतली जायची.
चाळलेली माती २१ दिवस भिजत ठेवली जाई. त्यामध्ये गूळ, बेल, भेंडी, गाईचे शेण, डिंक, घोड्याची लीद, साबुदाणा, कात, ताग, उडदाचे पीठ, जवसाचे पाणी, गुगुळ, हिरडा, बेहरडा, आवळा, बाबळीच्या बिया असे चिकटपणा निर्माण करणारे पदार्थ त्यात मिसळले जात. माती एकजीव व मऊ होण्यासाठी ती रोज रेडा, हत्ती, बैल किंवा माणसं यांच्याकडून तुडवली जाई. माती एकजीव झाल्यावर त्याच्या विशिष्ट आकाराच्या विटा तयार करीत. अशा विटांना भेंडे म्हणत.पांढऱ्या मातीचा उपयोग
- शेकडो वर्षांचा टिकाऊपणा
- घरबांधणीसाठी उपयुक्त
- पांढऱ्या मातीच्या बांधकामात गवत, झाडे उगवत नाहीत
- घरांच्या छतासाठी उपयुक्त
पांढऱ्या मातीवर संशोधन होण्याची गरजशिराळा तालुक्याचा विचार करता तालुक्याच्या ग्रामीण भागात पांढऱ्या मातीची घरे अजूनही दिसून येत आहेत. पांढऱ्या मातीच्या विटा सिमेंटपेक्षाही मजबूत असल्याचे दिसून येते. सध्या त्यामध्ये वास्तव्यास असलेले लोक ही घरे त्यांच्या पूर्वजांनी बांधलेली असल्याचे सांगतात. जुन्या लोकांनी हुशारीने बनवलेल्या या पांढऱ्या मातीवर सध्या संशोधन होण्याची गरज आहे.