सांगली : श्री शिवप्रतिष्ठानच्यावतीने परंपरेप्रमाणे मोठ्या उत्साहात बुधवारी पहाटे घटस्थापनेच्या दिवशी दुर्गामाता दौडीस प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या दौडीमध्ये महापौर संगीता खोत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, धारकरी सहभागी झाले होते.शिवतीर्थावर पहाटे साडे पाच वाजता महापौर खोत यांच्याहस्ते दुर्गामाता दौडीस प्रारंभ झाला. तिथून महापालिका, राजवाडा चौक, पटेल चौक, आमराई, कॉलेज कॉर्नर या मार्गे ही दौड दुर्गामाता मंदिराजवळ आली. यावेळी दुर्गामातेची आरती, पुजा व त्यानंतर प्रेरणामंत्र सादर झाले. यावेळी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.त्यानंतर ही दौड मिरा हौसिंग सोसायटी, टिंबर एरिया, कॉलेज कॉर्नर, आमराई अशा मार्गे पुन्हा शिवतीर्थावर आली. त्याठिकाणी पुन्हा ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र सादर करून समारोप करण्यात आला. भगवे ध्वज, पांढरा कुर्ता-पायजमा, भगवा शेला आणि डोईवर भगवे फेटे चढवून उत्साहात आणि शिवरायांच्या प्रेरणामंत्राचा उच्चार करीत कार्यकर्ते मोठ्या संख्येने दौडीत सहभागी झाले होते.
शिवज्योतीला मानवंदना देत पहिल्या दिवशीच्या दौडीची सांगता झाली. दौडीमध्ये नगरसेवक लक्ष्मण नवलाई, शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहन नितिन चौगुले, बाळासाहेब बेडगे, ऋतुराज बागडे, मोहनसिंह रजपूत, आनंदराव चव्हाण, हरीहर तानवडे, प्रदीप पाटील, अविनाश चिनके, विशाल निर्मळे, सुरेंद्र इंगळे आदी उपस्थित होते.महिलांकडून स्वागत, साखरवाटपटिंबर एरियामधील संभाजी कॉलनीत या दौडीचे स्वागत येथील महिलांनी सडा-रांगोळ््या घालून केले. औक्षण करून झाल्यानंतर महिलांनी सहभागी धारकऱ्यांसह नागरिकांना साखर वाटप केले. धारकरीही या उत्स्फूर्त व अनोख्या स्वागताने भारावून गेले होते.दौडीच्या मार्गावर बंदोबस्तदौडीच्या मार्गावर पहाटे पाच वाजल्यापासून मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली दुर्गामाता दौड प्रतिवर्षाप्रमाणे शांततेने पार पडली. स्वयंशिस्तीत शिवप्रतिष्ठानने ही दौड अत्यंत शांततेने व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडली.