सांगली : महापौर पदाच्या कारकीर्दीत पूर्णपणे पारदर्शी कारभार केला. काहींनी महासभेत केलेले अनेक ठराव अडविले. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याच्या ठरावावेळी तर मोठा त्रास झाला. अनेकांनी आडकाठी आणली, असा टोला महापौर गीता सुतार यांनी बुधवारी भाजप नेत्यांना लगाविला. शेरीनाल्याचा प्रश्न सोडविण्याची इच्छा मात्र अपूर्ण राहिल्याचे सांगितले.
महापौर गीता सुतार यांच्या कार्यकाळातील ही शेवटची महासभा होती. सभेच्या शेवटी त्यांनी वर्षभरात सहकार्य केलेल्यांचे आभार मानत असताना, भाजपच्या नेते व पदाधिकाऱ्यांना टोलेही लगाविले. त्या म्हणाल्या की, लग्नानंतर गेली १७ वर्षे सांगलीत राहते, पण कधी राजकारणाशी संबंध आला नाही. भाजपचे नेते शेखर इनामदार यांनी मला राजकारणात आणले. महापौरपदाच्या निवडीवेळीही सहकार्य केले. पती सुयोग सुतार यांचीही साथ लाभली. महापालिकेच्या राजकारणात नवखी असल्याने सुरुवातीचा काळ विविध प्रश्नांची माहिती करून घेण्यात गेला. त्यानंतर कोरोनाची महामारी सुरू झाली. या काळात आयुक्त नितीन कापडणीस यांनी आपल्या खांद्यावर संपूर्ण जबाबदारी घेत माझ्यावर कुठलाही ताण येऊ दिला नाही. काँग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील यांचेही मोठे सहकार्य लाभले. महासभेत आलेल्या विषयांचा अभ्यास केला.
पण काहीवेळा मलाही अडचणींना सामोरे जावे लागले. काही सदस्यांनी महासभेतील ठरावावर सह्या करण्यात आडकाठी आणली. नव्या सदस्यांना ठरावावर सह्या करण्यापासून रोखले. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याचा ठराव करण्यापासून अडविले गेले; पण काही महिला सदस्यांनी साथ दिल्याने हे ठराव करता आले. महापौरपदाच्या काळात शेरीनाल्याचा प्रश्न सोडविण्याची खूप इच्छा होती. त्यासाठी ४७ कोटींचा आराखडा तयार केला होता. पुन्हा संधी मिळाली, तर शेरीनाल्याचा प्रश्न सोडविण्याची इच्छा आहे, असे सांगताना त्या भावनावश झाल्या. भाजप नेते शेखर इनामदार यांनीही महापौरांच्या कारकीर्दीत सुतार यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. पारदर्शी कारभार करून आपली निवड सार्थ ठरविली असल्याचे सांगितले.
चौकट
सांगली मुंबईपेक्षा भारी होईल
महापौर गीता सुतार म्हणाल्या, महापालिकेतील सगळे नगरसेवक एकत्र आले, तर सांगली मुंबईपेक्षा भारी होईल. तिन्ही शहरात एकही खड्डा राहणार नाही. शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील. त्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.