सांगली : जिल्ह्यात मध्यम व लघु ८४ प्रकल्प (तलाव) असून त्यामध्ये केवळ २२ टक्केच पाणीसाठा आहे. ३२ तलावांमध्ये, तर ५० टक्केपेक्षा कमी पाणीसाठा असून सात तलाव कोरडे ठणठणीत आहेत. सध्या तर पावसाचा जोर कमी असल्यामुळे जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव आणि मिरज पूर्व भागातील खरीप हंगामातील पिके धोक्यात आहेत. या पिकांचे भवितव्य आता परतीच्या पावसावरच अवलंबून असल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यातील पाच मध्यम आणि ७९ लघु प्रकल्पांमध्ये ९ हजार ४४० दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्याची क्षमता आहे. पावसाळा संपण्याच्या मार्गावर असतानाही या प्रकल्पामध्ये केवळ दोन हजार ९९८.०७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. प्रकल्पातील पाण्याचा विचार केल्यास, ते केवळ २२ टक्केच भरले आहेत. पावसाचा जोर वाढला नाही, तर प्रकल्प १०० टक्के भरण्याची शक्यता धूसर आहे. पावसाळ्यातच तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रत्येकी दोन, खानापूर, आटपाडी, जत येथील प्रत्येकी एक प्रकल्प कोरडे ठणठणीत असल्याचा सांगली पाटबंधारे विभागाचाच अहवाल आहे. जिल्ह्यातील २३ प्रकल्पात केवळ २५ टक्के, तर ९ तलावात ५० टक्केपेक्षा कमी पाणीसाठा आहे. सहा प्रकल्पांमध्ये ७५ टक्के, तर पाच तलावांमध्येच शंभर टक्के पाणीसाठा आहे. पाच शंभर टक्के भरलेल्या प्रकल्पांपैकी चार शिराळा व एका वाळवा तालुक्यातील प्रकल्पाचा समावेश आहे.
शिराळा तालुक्यात ८५९.८ मिलिमीटर, तर आटपाडी तालुक्यात ५२ टक्के, जत तालुक्यात ९८.८ टक्के पाऊस झाला आहे. कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यात ११३.५ ते १२७.२ टक्के पाऊस झाला आहे. जून, जुलै या महिन्यात पावसाचा नेहमी जोर असतो. पण सध्या आॅगस्टचा पहिला आठवडा संपला तरीही पावसाचा जोर दिसत नाही. जिल्ह्यात केवळ ७८ टक्केच खरिपाच्या पेरण्या झाल्या असून जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यातील माळरानावरील पिकांनी माना टाकल्या आहेत. येथील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे. २२ टक्के शेतकºयांनी खरीप पेरणीच केलेली नाही. परतीचा पाऊस जोरदार झाला नाही, तर निम्म्या जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सिंचन योजनांतून पाझर तलाव भरा : महावीर पाटीलदुष्काळी तालुक्यात सध्याही पाणीटंचाईच आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजना चालू करुन दुष्काळी भागातील पाझर तलाव भरावेत. यामुळे काही शेतकºयांच्या पदरात तरी खरिपाची पिके पडणार आहेत. शासनाने सिंचन योजनांची वीज बिले टंचाईतून भरावीत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना उपाध्यक्ष महावीर पाटील यांनी केली आहे.यंदा २४.७ टक्के जादा पाऊस, तरीही खरीप अडचणीतसांगली जिल्ह्यात गतवर्षी १ जून ते ६ आॅगस्ट २०१७ अखेर ८८.७ मिलिमीटर पाऊस झाला होता. परंतु, परतीच्या पावसाने मान्सूनच्या एन्ट्रीचा बॅकलॉग भरुन काढला होता. त्यामुळे शेतकºयांच्या पदरात खरीप पिके पडली होती. यावर्षीची परिस्थितीही काही प्रमाणात तशीच आहे. १ जून ते ६ आॅगस्ट २०१८ अखेर जिल्ह्यात २५५.१ मिलिमीटर पाऊस झाला असून गतवर्षीच्या तुलनेत २४.७ टक्के जादा पाऊस झाला आहे. तरीही खरीप अडचणीत का?, असा प्रश्न साहजिकच पडणार आहे. पण, पावसाची आकडेवारी पाहिल्यास काही तालुक्यातच धो... धो... कोसळला आहे. शिराळा तालुक्यात ८५९.८, तर आटपाडी, जत तालुक्यात १०० मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झाला आहे. कवठेमहांकाळ, तासगाव, पलूस तालुक्यात दोनशे मिलिमीटरपेक्षा कमीच पाऊस झाला आहे. म्हणूनच पाच तालुक्यातील खरिपाची पिके धोक्यात आहेत.