दिलीप मोहितेविटा : टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याचे भूमिपूजन आणि शेतकरी मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विटा दौरा झाला. भाजपचे पालकमंत्री सुरेश खाडे वगळता महायुतीतील घटक पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच खानापूर मतदारसंघात महायुतीतच गटबाजी असल्याचे दिसून आले.
विटा येथे मंगळवारी शिवसेनेचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे पुत्र अमोल व सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याचे भूमिपूजन आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला मोठी गर्दी झाली. परंतु, महायुतीतील मित्र पक्षाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विटा दौरा अचानक रद्द झाला. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या मेळाव्याकडे पाठ फिरविली. मात्र, या मेळाव्यात विरोधी महाविकास आघाडीतील कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुहास शिंदे यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.
मतदारसंघावरील दावेदारीवरून वादखानापूर मतदारसंघात महायुतीतून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष ॲड. वैभव पाटील, भाजपमधून माजी आमदार राजेंद्र देशमुख व ब्रम्हानंद पडळकर हे प्रमुख दावेदार आहेत. प्रत्येक इच्छुकांनी आपल्या पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांचाही दौरा अचानक रद्द झाल्याने या दावेदारीला बळ मिळाले आहे. परंतु, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईतून व्हिडीओच्या माध्यमातून पाच मिनिटे मेळाव्याला उपस्थित असलेल्या जनतेला संबोधित केले. तरीही त्यांच्या पक्षाचे नेते व पदाधिकारीही मेळाव्याकडे फिरकले नाहीत.
“खानापूर मतदारसंघातील कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असल्याने महायुतीतील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही घटक पक्षांच्या स्थानिक नेत्यांना बोलाविणे आवश्यक होते. तरीही संयोजकांनी निमंत्रण दिले नाही. त्यामुळे न बोलाविता या कार्यक्रमाला जायला आम्ही 'बिन बुलाया मेहमान' नाही. - राजेंद्र देशमुख, माजी आमदार, भाजप
टेंभूच्या सहाव्या टप्प्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी शिवसेनेने शेतकरी मेळावा घेतला. परंतु या कार्यक्रमाला महायुतीतील घटक पक्षाला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित केलेला शेतकरी मेळावा, त्यांनी प्रायव्हेट लिमिटेड मेळावा केला. त्यामुळेच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप स्थानिक नेते व पदाधिकारी यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. - ॲड. वैभव पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट)