इस्लामपूर : फार्णेवाडी ते रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) दरम्यानच्या कृष्णा नदी पात्रालगत असणाऱ्या शेतीमधील मातीचा उपसा केला जात असल्याने नदीकाठच्या मळीच्या सुपीक जमिनी गायब होण्याचा धोका आहे. या माती उपशामुळे नदीचे पात्र रुंदावून जमिनी वाहून जाण्याची शक्यता नाही.
नदीकाठच्या या माती उपशावर महसूल विभागाचे कोणतेही नियंत्रण नसल्याने शेतकऱ्यांच्या नावाखाली मोठ्या माशांकडून ही माती उपसली जाते. महसूल विभागाकडून वीट व्यवसायासाठी माती उपशाचा परवाना दिला जातो. मात्र, त्याचे प्रमाण अगदीच नगण्य असते. स्वत:च्या शेतात माती टाकायची आहे, असे कारण दाखवत बेसुमार माती उपशामुळे नदीकाठच्या जमिनी खचून त्या वाहून जाण्याचा धोका आहे. तसेच नदीचे पात्र रुंदावून शेतकऱ्यांच्या उताऱ्यावरूनच ही शेती गायब होण्याची भीती आहे.