अशोक पाटील ल्ल इस्लामपूरवाळवा-शिराळ्यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी मंत्री जयंत पाटील, आ. शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव शिंदे या मातब्बर नेत्यांना धक्का बसला आहे. नानासाहेब महाडिक, वैभव नायकवडी, सी. बी. पाटील, जितेंद्र पाटील आणि माजी आमदार मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख यांनी आपापले गड अबाधित ठेवले आहेत. बागणी मतदार संघात सदाभाऊ खोत यांच्या मुलाचा पराभव झाला. मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांचेच वर्चस्व सिध्द झाले.लोकसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांना ऊस उत्पादक आणि काँग्रेससह घटक पक्षांनी ताकद दिल्यानेच ते यशस्वी झाले. याच शेट्टींच्या ताकदीवर आणि शिफारशीवर सदाभाऊ खोत मंत्री झाले. त्याची कबुलीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. परंतु जिल्हा परिषद निवडणुकीपासून खा. शेट्टी आणि खोत यांच्यात धुसफूस सुरु झाली आहे. त्यातच घराणेशाही, मतदारांना पैसे वाटप आणि विनय कोरे यांची भेट याची भर पडल्याने खा. शेट्टी नाराज झाले आहेत. याचा परिणाम बागणी मतदार संघातील मतदानावर झाला आहे.येलूर जिल्हा परिषद मतदार संघावर पहिल्यापासूनच महाडिक गटाने वर्चस्व ठेवले आहे. येथील जिल्हा परिषदेसह दोन्ही पंचायत समिती गणाच्या उमेदवारांना निवडून आणण्यात नानासाहेब महाडिक, राहुल महाडिक, जि. प. सदस्य सम्राट महाडिक यांना यश आले आहे. त्यांनी आपला गड अबाधित ठेवला आहे, तर कामेरी मतदार संघात सी. बी. पाटील यांनी यावेळी भूमिका बदलली होती. ते विकास आघाडीत सामील झाले होते. त्यांनी कामेरी जि. प. व कामेरी गणातील आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला. परंतु त्यांना ऐतवडे बुद्रुक गणातील उमेदवार निवडून आणता आला नाही. ही जागा राष्ट्रवादीला मिळाली. पेठ गटावरही महाडिक यांचेच राज्य असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. येथील सर्व जबाबदारी सम्राट महाडिक यांनी पेलली होती. साखराळे गणातील जागा राष्ट्रवादीला गेली. वाळव्यातील हुतात्मा गटाचा फॉर्म्युला यावेळीही अबाधित राहिला. यावेळी आघाडीतून लढलेल्या सुषमा नायकवडी यांना चार हजारावर मतांचे अधिक्य मिळाले. पडवळवाडीची आघाडी जागा निवडून आणली असली तरी, वाळवा पंचायत समिती गण राष्ट्रवादीच्या ताब्यात गेला.बोरगावमध्ये स्वत: आमदार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीची जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु येथे राष्ट्रवादीतील अंतर्गत दुहीचा फटका पुन्हा एकदा बसला. काँग्रेसच्या जितेंद्र पाटील यांनी येथे तिसऱ्यांदा विजयी होतानाच सोबत बोरगाव गणातील विजय खरात यांनाही विजयी केले. राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी ताकारी गण अबाधित ठेवण्यात यश मिळवले.खा. राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आणि भाजपचे आ. शिवाजीराव नाईक यांच्या पाठीशी जर राष्ट्रवादीविरोधात असलेले स्थानिक नेते आणि घटकपक्ष असतील तरच हे विजयी होऊ शकतात, हेच या निकालावरुन स्पष्ट झाले आहे.दोन भाऊंची गट्टी : भाजपची सुट्टी!शिराळ्यात पूर्वी दोन शिवाजीराव (देशमुख व नाईक) एकत्र होते. त्यावेळी मानसिंगराव नाईक यांना प्रत्येक निवडणुकीत पराभव पत्करावा लागत होता. आता दोन शिवाजीरावांत दरी असल्याने सत्यजित देशमुख आणि मानसिंगराव नाईक या दोन भाऊंनी गट्टी करून विधानसभेला मानसिंगराव नाईक यांना उमेदवारी दिली होती. यावेळी त्यांच्याविरोधात असलेल्या शिवाजीराव नाईक यांना पराभव पत्करावा लागला होता. आता या निवडणुकीतही दोन भाऊंनी गट्टी करुन आ. नाईक यांच्या भाजपचा धुव्वा उडवला.
वाळवा-शिराळ्यात मातब्बरांना धक्का
By admin | Published: February 24, 2017 11:48 PM