लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरुड : शिराळा पश्चिम आणि उत्तर भागात खरीप हंगामातील धूळवाफ पेरणीला मुहूर्तावर सुरुवात करण्यात आली. शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असून पेरणीच्या कामात कुटुंबातील सर्व जण व्यस्त आहेत.
शिराळा पश्चिम आणि उत्तर भागातील जास्तीत जास्त जमिनी उंचावर माळरानावर असून त्या निचऱ्याच्या असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात भात हे पारंपरिक पीक घेतले जाते. या भागातील शेतकरी दरवर्षी धूळवाफ पद्धतीने शेतीची पेरणी करत असतो. वादळी वारे आणि मुसळधार पावसाने ही पेरणी लांबणीवर पडली होती. अखेर शेतकऱ्यांनी २१ तारखेचा पेरणीचा मुहूर्त साधत सुरुवात केली आहेत. यावर्षी करण्यात येणाऱ्या पेरणीत शिराळी, कोमल, राधानगरी, इंद्रायणी, गंगा-कावेरी, आर-वन, पूनम, बलवान, आरजे-९५, मंजिरी बासमती आदी भात बियाण्यांची पेरणी होणार आहे. पेरणीचा हंगाम सुरू झाल्याने कुटुंबातील सर्वांची लगबग सुरू झाली आहे.