लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पंढरपुरातील मरणासन्न वृद्धेने घरातच राहून कोरोनावर मात करण्याची जिद्द केली, तिला साथ दिली सांगलीच्या डॉक्टरांनी. टेलीमेडिसीनद्वारे अैाषधोपचार करत तिला नवजीवन दिले.
राहीबाई पाटील असं ६५ वर्षीय वृद्धेचं नाव. पंढरपूरजवळच्या एकलासपूरची. घरात कोरोनाने पुरते हातपाय पसरले होते. तिच्यासह चौघेजण बाधित. तिघेजण रुग्णालयांत होते. बेड मिळत नसल्याने राहीबाई घरातच होत्या. प्राणवायू झपाट्याने खालावत होता. प्रचंड खोकला, अंग तापाने फणफणलेले. मुलगा दिगंबरला कोणीतरी डॉ.विशाल सकटेंचा क्रमांक दिला. डॉ.सकटे इस्लामपूरचे रहिवासी. सांगलीच्या डॉ.वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातून नुकतेच पुण्याला गेले आहेत. तेथे महापालिकेच्या जंबो कोविड रुग्णालयात उपचार करत आहेत.
दिगंबरने व्हिडीओ कॉलद्वारे राहीबाईची प्रकृती दाखविली. प्रकृती गंभीर असल्याने त्वरित रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला डॉ.सकटे यांनी दिला. या दरम्यान, राहीबाईला रुग्णालयाचा धसका बसविणाऱ्या घटना घडल्या. व्हेंटिलेटरवरचे घरातील दोघे सदस्य दगावले. वैद्यकीय बिले काही लाखांच्या घरात गेली होती. हे सारं पाहिल्यानंतर त्यांनी निर्धार केला, घरातच राहून बरी होईन. काहीही झालं, तरी रुग्णालयात जाणार नाही. शेवटी दिगंबरने डॉ. सकटे यांनाच साकडे घातले.
डॉक्टरांनीही धाडस केले. सूचनेनुसार अैाषधोपचार घेण्याचा शब्द राहीबाई व दिगंबरकडून घेतला. त्यानंतर सुरू झाले टेलीमेडिसिनचे सत्र. घरात ऑक्सिमीटर घेतले. काही औषधेही लिहून पाठविली. डॉक्टरांच्या सूचनांनुसार उपचार सुरू झाले. दिवसातून तीन वेळा ऑक्सिजन तपासून दिगंबर फोटो पाठवायचा. व्हिडीओ कॉल, फोन काॅलवरून डॉक्टरांनी राहीबाईच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले. काही श्वसनाचे व्यायामही करून घेतले. हळूहळू सुधारणा होत गेली. गेल्या शनिवारपर्यंत लक्षणे पूर्णत: नाहिशी झाली. ऑक्सिजन पातळी ९३-९६ पर्यंत वाढली. उपचारांनंतर पुन्हा तपासणीची गरज नसते, पण दिगंबरने सरकारी रुग्णालयात तपासणी केली. अहवाल निगेटिव्ह होता. राहीबाईने निर्धाराने कोरोनावर मात केली.
चौकट
नियमित प्राणायाम आणि काटेकोर अैाषधोपचारांमुळेच आई कोरोनामुक्त झाली. रुग्णालयात लाखो रुपयांच्या खर्चानंतरही जगण्याची शाश्वती नव्हती, पण आईने जिद्दीने कोरोनावर मात केली.
- दिगंबर पाटील, राहीबाईंचा मुलगा