सांगली : ऐककाळी राज्याचे नेतृत्व करणाऱ्या सांगली जिल्ह्यात ३५ ते ४० वर्षांपासून घराणेशाहीचा पगडा कायम आहे. त्यासाठी जत व मिरज या दोन राखीव मतदारसंघाचा अपवाद आहे. उर्वरित सांगली, तासगाव-कवठेमहांकाळ, खानापूर, कडेगाव-पलूस, इस्लामपूर व शिराळा या सहा मतदारसंघांतील राजकारण केवळ दोन ते तीन कुटुंबाभोवती फिरताना दिसत आहे. सध्याच्या जिल्ह्यातील राजकारणात घराणेशाहीतील तिसरी पिढी सक्रिय झाली आहे. मात्र, २००९ ची मतदारसंघ पुनर्रचना व २०१४ च्या मोदी लाटेनंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलत आहे. त्यामुळे नवीन चेहरे विधानसभेला पुढे येत आहेत.देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील सांगली जिल्ह्यातून (जुना दक्षिण सातारा) भूमिगत कार्यकर्त्यांना राजकारणात संधी मिळाली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, क्रांतीसिंह नाना पाटील, जी. डी. लाड, एन. डी. पाटील व क्रांतिवीर नागनाथ नायकवडी यांचे नेतृत्व १९८० च्या दशकापर्यंत राजकारणात पुढे आले. १९९० या काळात दुसऱ्या पिढीतील जयंत पाटील, डॉ. पतंगराव कदम, आर. आर. पाटील, प्रकाशबापू पाटील, मदन पाटील, संभाजीराव पवार, सुरेश खाडे, अजितराव घोरपडे, संजय पाटील, अनिल बाबर, सदाशिव पाटील, पृथ्वीराज देशमुख, शिवाजीराव नाईक यांचे नेतृत्व पुढे आले.२००९ साली विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यामुळे जिल्ह्यातील घराणेशाही व तडजोडीच्या राजकारणाला धक्के बसू लागले. पहिला धक्का २०१४ च्या मोदी लाटेत बसला. त्यामुळे सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, मानसिंगराव नाईक, विश्वजित कदम, विक्रम सावंत असे नवे चेहरे राजकारणात आले. बदलत्या राजकीय समीकरणात घराणेशाहीचा पगडा मात्र कायम राहिला आहे. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत रोहित पाटील, प्रभाकर पाटील, सुहास बाबर, ॲड. वैभव पाटील, राजवर्धन घोरपडे, अशी घराणेशाहीचा पगडा असलेली काही युवा नेत्यांची नावे पुढे येताना दिसत आहेत.
जत व मिरज राखीवचा अपवाद..२००९ च्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेपर्यंत जत मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता. त्यामुळे अनेकदा या मतदारसंघाचे नेतृत्व बाहेरील आयात उमेदवारांनी केले. २००९ मध्ये हा मतदारसंघ खुला होऊन मिरज राखीव झाला. त्यामुळे २००४ ला जतचे नेतृत्व करणारे आमदार सुरेश खाडे हे २००९ नंतर मिरजेचे नेतृत्व करू लागले. हे दोन मतदारसंघ राखीव राहिल्याने घराणेशाहीच्या प्रभावापासून दूर राहिले.
अशी आहे, जिल्ह्यातील सहा मतदारसंघांतील घराणेशाहीसांगली सांगली विधानसभा मतदारसंघात १९७८ ते २००९ पर्यंत म्हणजे ३१ वर्षे वसंतदादा पाटील व संभाजीराव पवार या दोन घराण्यांत सत्ता फिरत होती. मधल्या काळात दिनकर पाटील यांना संधी मिळाली. हा अपवाद वगळता २०१४ ला देशातील मोदी लाटेच्या तडाख्यात सुधीर गाडगीळ हे नवे नेतृत्व सांगली मतदारसंघाला मिळाले. २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा वसंतदादा यांच्या घराण्यातून जयश्री पाटील व गुलाबराव पाटील यांचे पुत्र पृथ्वीराज पाटील इच्छुक आहेत.
तासगाव-कवठेमहांकाळ..तासगाव विधानसभा मतदारसंघात १९७८ ते १९९० या काळात दिनकरराव पाटील हे निवडून येत होते. त्यानंतर १९९० ते २०१४ या काळात मतदारसंघाचे नेतृत्व आर. आर. पाटील यांनी केले. त्यांच्या निधनानंतर २०१५ ते २०२४ त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील या आमदार आहेत. २०२४ च्या निवडणुकीत त्यांचे पुत्र रोहित पाटील हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यांच्या विरोधात माजी खासदार संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील हे मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.
खानापूर-आटपाडी..१९८०ला हणमंतराव पाटील हे आमदार झाले. १९९० साली अनिल बाबर निवडून आले. त्यानंतर गेल्या ३४ ते ४४ वर्षांपासून पाटील व बाबर या घराण्याच्या हाती खानापूर मतदारसंघाचे नेतृत्व आहे. त्याला १९८५ साली संपतराव माने व १९९५ साली राजेंद्र देशमुख यांचा अपवाद आहे. २००४ ते २०१४ या काळात ॲड. सदाशिव पाटील आणि २०१४ ते २०२४ या काळात पुन्हा अनिल बाबर या मतदारसंघाचे नेतृत्व करीत होते. आगामी २०२४ च्या निवडणुकीत पुढच्या पिढीतील सुहास बाबर व ॲड. वैभव पाटील हे निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.
इस्लामपूर (वाळवा)..आताच्या इस्लामपूर मतदारसंघाचे नाव पूर्वी वाळवा होते. पूर्वी या मतदारसंघाचे नेतृत्व राजारामबापू पाटील करीत होते. १९९० पासून सलग ३४ वर्षे या मतदारसंघाचे आमदार म्हणून जयंत पाटील हे नेतृत्व करीत आहेत. २०२४ च्या निवडणुकीसाठी त्यांचे पुत्र प्रतीक पाटील हे वडिलांसाठी मोर्चेबांधणी करीत निवडणुकीची धुरा सांभाळताना दिसत आहेत.
शिराळा..१९७८ ते १९९५ या काळात शिराळा मतदारसंघात शिवाजीराव देशमुख यांचे एकमुखी नेतृत्व होते. १९९५ ते २००९ या काळात शिवाजीराव नाईक हे निवडून आले. २००९ ते २०२४ मानसिंगराव नाईक हे शिराळा मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. गेल्या ४६ वर्षांपासून देशमुख व नाईक या कुटुंबांभोवती शिराळ्याचे राजकारण फिरताना दिसत आहे.
कडेगाव-कडेपूरपूर्वीच्या भिलवडी-वांगी मतदारसंघाचे नाव आता कडेगाव-कडेपूर झाले आहे. या मतदारसंघातून १९८५ ते १९९५ या काळात डॉ. पतंगराव कदम हे नेतृत्व पुढे आले. त्यानंतर १९९५ ते १९९६ अशा दोन निवडणुकांत संपतराव देशमुख व पृथ्वीराज देशमुख यांनी नेतृत्व केले. १९९८ ते २०१८ पर्यंत पुन्हा डॉ. पतंगराव कदम यांनी नेतृत्व केले. त्यांच्या निधनानंतर २०१८ पासून या मतदारसंघाचे नेतृत्व डॉ. विश्वजित कदम हे करीत आहेत. याचा अर्थ, १९८५ ते २०२४ या ३९ वर्षांपासून कदम व देशमुख यांच्या कुटुंबाभोवती मतदारसंघाचे राजकारण फिरत आहे.