गजानन पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसंख : केशर, हापूस आंबा म्हटले की कोकणची आठवण येते. सुधारित तंत्राचा वापर, योग्य व्यवस्थापन, कष्ट व जिद्द या जोरावर बनाळी (ता. जत) येथील काकासाहेब सावंत या शेतकऱ्याने फोंड्या माळरानावर दहा एकर क्षेत्रावर आंब्याची बाग उभी केली आहे.काकासाहेब सावंत यांनी पुणे येथील टेल्को कंपनीची नोकरी सोडून कृषी विभागाच्या सहकार्याने यशस्वी शेती करून दाखविली आहे. सेंद्रीय खतांचा वापर, पाण्याची काटकसर यामुळे निकृष्ट जमिनीतसुद्धा नंदनवन उभा करता येते, हा त्यांनी आदर्श घालून दिला आहे. दुष्काळी भागातील शेती विकासाचे आदर्श मॉडेल खडकाळ माळरानावर उभा राहिले आहे. विशेष म्हणजे या आंब्याच्या बागेतून त्यांनी २० लाख रुपये एवढे उत्पन्न मिळवले आहे.आपल्या दोन शिक्षक बंधूंच्या मदतीने पंधरा एकर माळरानावर फळबाग लागवडीचा प्रयोग सुरू केला. हा भाग कायमचाच दुष्काळी आहे. तरीही त्यांनी ७० फूट खोल विहीर खणली. त्या पाण्यावर दहा एकर आंबा, एक एकर चिक्कू, एक एकर डाळिंब, तीन एकर चिंच, दोन एकर सीताफळ अशा फळबागा उभ्या केल्या आहेत. बागा उभा केल्यानंतर पाचव्यावर्षी उत्पन्नाला सुरुवात झाली. मोहर आल्यानंतर फवारणी करून योग्य खतांची मात्रा दिली जाते.२०१२ ते १४ या तीन वर्षात भीषण दुष्काळ पडला होता. सहा कूपनलिका घेऊन त्यांनी पाणी मिळवण्यासाठी धडपड केली; पण अपेक्षित पाणी मिळालेच नाही. शेवटी टँकरने पाणी आणून बाग जगवली. फळबागेच्या मध्यभागी १, ५०, १५० फूट लांबीचे शेततलाव घेऊन पूर्ण फळबागेला ठिबक सिंचनने पाणी दिले. म्हैसाळचे पाणी बनाळीच्या शिवारात आल्यानंतर दोन किलोमीटरची पाईपलाईन करून शाश्वत पाण्याची सोय केली. कृषी विभागाच्या विविध योजनांचा योग्य लाभ त्यांनी घेतला आहे. उपविभागीय कृषी अधिकारी कांताप्पा खोत, तालुका कृषी अधिकारी संभाजी सावंत, कृषी सहायक कोळेकर यांचे मार्गदर्शन लाभले.आंबा फळबागेबरोबरच २०१७ ला शासनाचा अधिकृत परवाना घेऊन विविध फळझाडांची रोपवाटिका सुरू केली आहे. रोपवाटिकेला आदर्श व्यवस्थापनासाठी सांगली जिल्हा परिषदेचा ‘आर. आर. पाटील शेतिनिष्ठ पुरस्कार’, ‘अहिल्यादेवी होळकर कृषिभूषण पुरस्कार’, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ‘शिवार कृषिरत्न पुरस्कार’ असे पुरस्कार मिळाले आहेत.भविष्यात आदर्श रोपवाटिकेबरोबरच सर्व सोयींनीयुक्त अद्ययावत असे कृषी पर्यटन केंद्र व लहान मुलांसाठी चिल्ड्रन पार्क करण्याचा मनोदय सावंत कुटुंबियांनी यावेळी व्यक्त केला आहे.वीस टन उत्पादनमोहर आल्यावर दर महिन्याला एक सूक्ष्म अन्नद्रव्य फवारणी केली. बाग उभा केल्यानंतर पाचव्यावर्षी उत्पन्नाला सुरुवात झाली. मोहर सुटल्यानंतर फवारणी करून योग्य खतांची मात्रा दिली जाते. गेल्यावर्षी प्रत्येक झाडाला १५ ते २० किलो फळे मिळाली. एकूण बागेतून २० टन उत्पादन झाले. कच्च्या आंब्याला जागेवर १२५ रुपये किलो दर मिळाला.
ंदुष्काळी माळावर केशर, हापूस दरवळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 11:21 PM