माडग्याळ (सांगली): जत पूर्वभागात आज, शनिवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे जतच्या पूर्व भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. कोणतीही हानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.जत पूर्वभाग आणि कर्नाटक सीमावर्ती भागात आज सकाळी ६.२२ वाजताच्या सुमारास वीस ते तीस सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे जत पूर्व भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. माडग्याळ, सोन्याळ, बेळोंडगी, बोर्गी, करजगी, कोंतेवबोबलाद, संख, गिरगाव व मोरबगी आदी गावात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी टीव्ही पाहणारे व घरात झोपलेल्या नागरिकांना हे धक्के जाणवले आहेत. घरातील भांडी पडणे, बंद पंखे हलणे, पत्र्याचे घर हलणे आदी बाबी नागरिकांना जाणवल्या.भूकंपाचा केंद्रबिंदू विजयपूर (विजापूर) जिल्ह्यात विजयपूरपासून पंधरा किलोमीटर असल्याचे सांगण्यात येत आहे. जत पूर्व भागात तरी कोणतेही नुकसान झाले नसल्याचे समजते. केवळ धक्के जाणवले आहेत. काल रात्रीपासून जत पूर्व भागात रिमझिम पाऊस सुरु आहे. तो आज सकाळपर्यंत सुरुच होता. पावसामुळे सर्व नागरिक सकाळी सकाळी घरीच असल्याने भूकंपाचे धक्के नागरिकांना लवकर जाणवले.
सांगली : भर पावसात जत पूर्वभागामध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2022 12:20 PM