सांगली : मान्सूनने पहिल्या टप्प्यात सर्वांचीच धाकधुक वाढविली असताना, पंधरवड्यापासून होत असलेल्या पावसाने गेल्या तीन वर्षातील कसर भरून काढली आहे. जिल्ह्याच्या पूर्वभागात मात्र अजूनही टॅँकरनेच पाणीपुरवठा सुरू आहे. टॅँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या जत तालुक्यातील गावांची संख्या मोठी असून, यात घट होत असली तरी एकीकडे जिल्ह्याचा पश्चिम भाग दमदार पावसामुळे पुराच्या उंबरठ्यावर उभा असताना पूर्वभाग मात्र अजूनही तहानलेलाच आहे. जिल्ह्यातील १२५ हून अधिक गावे टॅँकरवरच अवलंबून आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने डोळे वटारल्याने शेतकऱ्यांसह सामान्यजनही चिंतेत होते. मात्र, त्यानंतर पावसाने सर्वत्र दमदार हजेरी लावली. गेल्या पंधरा दिवसात तर विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, त्याचवेळी जिल्ह्यातील जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ, तासगावच्या काही भागात केवळ वारे वाहत होते. जिल्ह्यातील पावसाची सरासरी लक्षात घेतली तर १५७.७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. यात शनिवार २३ जुलैअखेर शिराळा तालुक्यात ७७६.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचवेळी आटपाडी तालुक्यात १६०.३ मि.मी., जत तालुक्यात १५५.५ मि.मी. खानापूर तालुक्यात १८९.४ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या टॅँकरची संख्या कमी होत असली तरी जिल्ह्याच्या एका भागात दमदार पाऊस आणि एका भागात टंचाईची स्थिती हे परस्परविरोधी चित्र पाहावयास मिळत आहे. १६ जुलैअखेर १२९ गावांमध्ये पाण्याचे टॅँकर सुरू होते. यात जत तालुक्यातील सर्वाधिक ५० गावांत टॅँकरने पाणी पुरवठा सुरू असून, ३९९ वाड्या-वस्त्यांवर टॅँकर सुरू आहे. विशेष म्हणजे अजून दहा ठिकाणी नव्याने टॅँकर सुरू करण्याची मागणी होत आहे. यात जिल्ह्यातील मिरज, पलूस, वाळवा व शिराळा तालुक्यात सुरू असलेल्या टॅँकर थांबले असले तरी जत, आटपाडी, तासगाव तालुक्यात अजूनही टॅँकर सुरूच आहेत. यात तासगाव तालुक्यात २७ गावात, आटपाडी तालुक्यात २० गावांत टॅँकर सुरू आहेत. आठवड्यापूर्वी झालेल्या दमदार पावसावेळी हे वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागात वळविण्याची मागणी होत होती. मात्र, सध्या पूर्वभागात कमी पाऊस झाला असला तरी, या भागाला परतीच्या मान्सूनचा आधार असतो. त्यामुळे त्यानंतरच पाणी देण्याबाबत कार्यवाही होऊ शकते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)योजनांनी दिला आधार ऐन पावसाळ्यातही टंचाई परिस्थिती कायम असताना मिरज पूर्वभाग, कवठेमहांकाळ, तासगाव व जत तालुक्यातील काही भागांना तसेच आटपाडी, कडेगाव भागालाही त्यावेळी सुरू असलेल्या पाणी योजनांचा चांगला आधार मिळाल्याचे दिसून आले. ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू योजनेमुळे टॅँकरची संख्या आटोक्यात राहण्यास मदत झाली.
जिल्ह्याचा पूर्व भाग अजूनही तहानलेला
By admin | Published: July 23, 2016 10:51 PM