लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महाराष्ट्र एसटी कर्मचारी आयोग संयुक्त कृती समितीने सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसह अन्य प्रलंबित प्रश्नांसाठी सोमवारी (दि. १६) मध्यरात्रीपासून राज्यभर सुरु केलेला संप बुधवारीही चालूच होता. यामुळे प्रवाशांचे मात्र ऐन दिवाळीत हाल सुरु आहेत. जिल्ह्यातील ८५२ बसेसची वाहतूक बंद असल्यामुळे खासगी प्रवासी वाहतूकदारांनी तीन ते चार पटीने प्रवास दर वाढविले आहेत.एसटी कर्मचारी आयोग संयुक्त कृती समितीच्यावतीने सातव्या वेतन आयोगासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी मध्यरात्रीपासून संप सुरू आहे. मंगळवारी सांगली जिल्ह्यातील ८५२ बसेसपैकी केवळ १२ बसेसच्या फेºया झाल्या व ३०२ किलोमीटर बसेस धावल्या. उर्वरित दोन लाख ९९ हजार किलोमीटर अंतरावर बसेस धावल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सांगली विभागातील दहा आगारांचे ७५ लाख रूपयांचे उत्पन्न बुडाले आहे.बुधवार, दि. १८ रोजी एकही बस धावली नसल्यामुळे सर्व ८५२ बसेस आगारामध्ये थांबून होत्या. जवळपास दोन लाख ९९ हजार ५०० किलोमीटर अंतरावर बसेस धावल्या नसल्यामुळे दुसºयादिवशी एसटीचे ६५ लाखांचे उत्पन्न बुडाले आहे. दिवाळीत एसटीकडे प्रवाशांचा ओढा जास्त असतो. हा संप आणखी दोन दिवस चालू राहिल्यास एसटीचा दिवाळीतील उत्पन्न मिळविण्याचा महत्त्वाचा कालावधी वाया जाणार आहे. एसटी कर्मचारी संपावर गेल्याचा सर्वाधिक फटका बुधवारी प्रवाशांना सहन करावा लागला. सारेच हात झटकून मोकळे होत होते. त्यामुळे सर्वच प्रवाशांचे अतोनात हाल झाले. यातून वृध्द, महिला, गरोदर महिला, बालके यांचीही सुटका नव्हती. हे सारे प्रवासी केविलवाण्या अवस्थेत निराशेने बसस्थानक परिसरात बसले होते. घर असूनही घरी जाण्यासाठी काही तरी वाहन मिळेल, या आशेने हे प्रवासी इकडून तिकडे भटकत होते. सांगलीच्या मुख्य बस स्थानकासमोरच खासगी बसेस आणि चारचाकी गाड्यांची गर्दी झाली होती. काही ठिकाणी खासगी वाहतूकदार जादा पैसे घेऊन वडाप करण्यात मग्न होते. यावेळी एकही पोलिस किंवा प्रशासनाचा एकही अधिकारी वा कर्मचारी प्रवाशांच्या मदतीला आले नाहीत. सांगली बस स्थानकाबाहेरही अनेक प्रवासी आपल्या कुटुंबासह आपापल्या बॅगा, पिशव्या घेऊन महिला, लहान मुलांसह घरी जाण्यासाठी वाहन शोधत असल्याचे चित्र दिसत होते.पुणे-मुंबईहून सांगलीत आलेले प्रवासी ग्रामीण भागात जाण्यासाठी कोणतीच सोय नसल्यामुंळे वैतागले होते. काही ठिकाणी प्रवासी आणि खासगी वाहतूक करणाºयांमध्ये प्रवास भाड्यावरुन वादावादी सुरू होती. एसटी बंदचा सर्वांत जास्त फायदा खासगी वाहतूकदारांनी उचलला.ऐन दिवाळीत बसस्थानकात अडकलेल्या प्रवाशांना गावी पोहोचविण्यासाठी अनेकांनी दुप्पट-तिप्पट दर लावून प्रवाशांची लूट सुरू केली आहे.चंद्रकांतदादांकडून कर्मचाºयांची बदनामीमहसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी, ‘संप चिघळल्यास एसटी कर्मचाºयांना प्रवासीच चोपतील’ असे विधान करून महाराष्टÑातील एसटी कर्मचाºयांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रवाशांना एसटीतील कर्मचाºयांच्या दु:खाची जाण आहे. अत्यंत तुटपुंज्या वेतनावर हे कर्मचारी काम करत आहेत. न्याय्य मागण्यांसाठी दोन वर्षांपासून शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू होते. तरीही याकडे राज्य सरकारने लक्ष दिले नसल्यामुळे बेमुदत संप करावा लागला आहे. या सर्व गोष्टीची जाण असल्यामुळे, प्रवासी एसटी कर्मचाºयांना नव्हे, तर राज्य सरकारमधील मंत्र्यांनाच चोपतील, असा प्रतिटोला महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष बिराज साळुंखे यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना लगावला.खासगी बसेससह अन्य वाहनांचा आधारएसटीचे चालक व वाहक संपावर गेल्यामुळे सांगली आगाराने बुधवारी चार खासगी बसेस आणि सात चारचाकी वाहने, तसेच मिरज आगाराने चार चारचाकी वाहनांचा आधार घेऊन प्रवाशांची सोय केली. पण, या खासगी प्रवासी वाहतूकदारांकडूनही प्रवाशांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी काही प्रवाशांनी केल्या.कर्मचाºयांच्या आंदोलनास संघटनांचा पाठिंबापगारवाढीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाºयांच्या आंदोलनास बुधवारी जनता दलाचे नेते माजी आमदार शरद पाटील, अॅड. के. डी. शिंदे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, आरपीआयचे सुरेश दुधगावकर यांनी भेट देऊन, कामगारांच्या न्याय्य लढ्यासाठी आमचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले.जतमध्ये दिवाकर रावतेंचा पुतळा जाळलासंपावेळी जत येथील एसटी कर्मचाºयांच्या भावनांचा उद्रेक झाला. त्यामुळे कर्मचाºयांबद्दल चुकीची विधाने केली जात असल्याच्या निषेधार्थ येथे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. तसेच या पुतळ्याची जत शहरातून अंत्ययात्राही काढण्यात आली. यावेळी कर्मचाºयांनी शासनाच्या निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या.
एसटीच्या संपात प्रवाशांची आर्थिक लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 12:00 AM