अविनाश कोळी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गेल्या सहा महिन्यांपासून सतत दरवाढीचे नवे विक्रम नोंदविणाऱ्या खाद्यतेलांमध्ये गेल्या दोन दिवसांत लिटरमागे ५ ते ७ रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सामान्य लोकांना अल्प दिलासा मिळाला आहे. आगामी काळात शासनाच्या धोरणांवर तेलाचे दर अवलंबून राहणार असले तरी तेल उद्योजक व व्यावसायिकांना दर कमी होण्याची आशा आहे.
भारत हा खाद्यतेलाचा जगातील आघाडीचा खरेदीदार आहे. देशातील एकूण खाद्यतेलात ७० टक्के खाद्यतेल हे आयात केलेले असते. ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या काळात भारताने एकूण १ कोटी ३२ लाख ८२ हजार ४२७ टन खाद्यतेल आयात केले होते. त्यामुळे भारतातील तेलाचे जागतिक बाजारपेठेतील अवलंबित्व अधिक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या सहा महिन्यात खाद्यतेलांच्या किमती वाढल्याने भारतात खाद्यतेलाच्या किमतीत ३५ टक्के वाढ झाली.
गेल्या दोन दिवसांत ५ ते ७ रुपये प्रतिलिटरमागे कमी झाले असून, दहा किलोच्या डब्यामागे आता ५० ते ७० रुपयांपर्यंतची बचत होत आहे. हा दिलासा अल्प असला तरी दरवाढीचा आलेख थांबल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पामतेलाचा किरकोळ बाजारातील दर ११० रुपये लिटरवरून १०५ रुपये, सोयाबीन तेलाचा दर ११८ वरून ११२ रुपये, सरकी तेलाचा भाव १२५ वरून १२० रुपये झाला आहे. काही कंपन्यांनी दरात ७ रुपयांपर्यंत घट केली आहे.
चौकट
आंतरराष्ट्रीय बाजार काय चालू आहे...
भारताने खाद्यतेलाचे दर नियंत्रणात यावेत म्हणून तेलांवरील आयात शुल्क ३७.५ वरून २७.५ टक्के म्हणजेच १० टक्के घटविले; मात्र दुसरीकडे मलेशिया या मोठ्या निर्यातदार देशाने खाद्यतेलावर ८ टक्के निर्यात कर लादला. दुसरीकडे इंडोनेशिया या निर्यातदार देशानेही ३ डॉलरवरून ३३ डाॅलरपर्यंत निर्यात शुल्क वाढविले. त्यामुळे दरांवर परिणाम झाला आहे.
चौकट
आशादायी चित्र
सांगलीतील तेल उद्योजक सुनील ओस्वाल यांनी सांगितले की, सध्या तेलाचे दर थोडे कमी झाले असले तरी भविष्यात काय होईल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. मिरजेतील तेलाचे व्यापारी गजेंद्र कुल्लोळी यांनी सांगितले की, सध्या दर काही प्रमाणात घटले आहेत. लोकांनी आता पर्यायी खाद्यतेलांचा वापर सुरू केला आहे. हे वातावरण असेच राहिले तर दरावर नियंत्रण शक्य आहे.