सांगली : भारतातील खाद्यतेलाचे किरकोळ बाजारातील दर वाढतच असून, सामान्य नागरिक यामुळे हैराण झाला आहे. गेल्या महिनाभरात खाद्यतेलाच्या दरात १० ते १५ रुपयांनी वाढ झाली आहे.
कच्च्या मालाचा तुटवडा, आयातीचा वाढता असलेला खर्च व इंधन दरवाढीमुळे खाद्यतेलाचे देशातील दर वाढतच आहेत. भारतातील एकूण खाद्यतेलात ७० टक्के खाद्यतेल हे आयात होते. सध्या मागणीच्या तुलनेत ३० टक्के पुरवठाही घटल्याने त्याचाही दरावर परिणाम होत आहे. गेले वर्षभर खाद्यतेलाच्या किमतीचा आलेख चढताच आहे. सध्याच्या लॉकडाऊन काळातही खाद्यतेलाच्या दरवाढीचा भडका उडाला आहे.
खाद्यतेलाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी भारताने आयात शुल्क दहा टक्के कमी केले असले तरीही त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. निर्यातदार देशांतील या खाद्यतेलांवरील निर्यात शुल्काचा भार वाढविला आहे. त्यामुळे हे दर लवकर नियंत्रणात येण्याची शक्यता दिसत नाही. यापुढेही दरात वाढ होण्याचा अंदाज विक्रेते व्यक्त करीत आहेत. मलेशिया, इंडोनेशिया, अर्जेंटिका, चीन आदी देशांकडून भारतात मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल आयात केले जात आहे.
चौकट
आयात घटली
फेब्रुवारी २०२१ मध्ये भारताने एकूण ७ लाख ९६ हजार ५६८ टन खाद्यतेलाची आयात केली. फेब्रुवारी २०२० मध्ये ही आयात १० लाख ८९ हजार टन इतकी होती. म्हणजेच आयातीत २७ टक्के घट झाली आहे.
चौकट
वर्षभरात हजार रुपयांनी वाढले दर (प्रती पंधरा लीटर)
तेल एप्रिल २० एप्रिल २१
सूर्यफूल १६०० २६००
सरकी १४०० २४७०
सोयाबीन १४०० २३००
चौकट
असे वाढले दर (रुपये प्रतिकिलो)
तेल मार्च २१ एप्रिल २१
सूर्यफूल १६५ १७५
सोयाबीन १४० १५३
शेंगदाणा १७० १८६
सरकी १४८ १६०
पाम १४० १४९
कोट
खाद्यतेलाच्या दरात एप्रिलमध्येही मोठी वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठ्यातील प्रच्ंड कमतरता व आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा हा परिणाम आहे. पुरवठाही ३० टक्के घटला आहे. सर्व प्रकारच्या तेलांच्या दरावर सध्या परिणाम होत आहे.
- गजेंद्र कुल्लोळी, खाद्यतेल व्यापारी, मिरज