इस्लामपूर : शिक्षणाने माणसाची दशा आणि दिशा बदलते, असे प्रतिपादन कवी प्रा. प्रदीप पाटील यांनी केले. येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली.
ते म्हणाले की, बहुजन समाज हा पुढे गेला पाहिजे, यासाठी कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. कर्मवीर अण्णांनी बहुजन समाजातील मागासलेपण दूर व्हावे यासाठी भगीरथ प्रयत्न केले. शिक्षणाचा उद्देश व्यक्तिमत्त्वाचा विकास, क्षमतांचा विकास करणे हा आहे.
प्राचार्य डॉ. ए. एम. जाधव म्हणाले की, विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानापेक्षा आपली कौशल्ये विकसित करावीत. वाचन समृद्ध करून थोरा-मोठ्यांचे कार्य समजून घ्यावे. अंकिता इंगळे या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले.
प्रा. युवराज वाघमारे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. प्रमोद पाटील यांनी परिचय करून दिला. प्रा. एन. आर. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. आर. डी. पाटील यांनी आभार मानले.