शिराळा
: सगळ्यात मोठी संपत्ती शिक्षण आहे. तरुणांनी शिक्षणाच्या मागे लागले पाहिजे, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी केले.
शिराळा येथील श्री विवेकानंद सांस्कृतिक, क्रीडा व सेवा मंडळच्या विवेकानंद व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना ‘आजची तरुणाई व पोलिसांची भूमिका’ या विषयावर ते बोलत होते.
पिंगळे म्हणाले की, आजची तरुणाई भरकटताना दिसून येत आहे. त्यांना दिशा देण्याची गरज आहे. आज तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढली आहे. नशा करण्याचे अनेक प्रकार या तरुणांमध्ये दिसून येत आहेत.
अगदी अल्पवयीन मुलेदेखील यात ओढली जात आहेत. याचा पालकांनी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. हुशार विद्यार्थी जेव्हा चैनी करण्यासाठी, महागडा मोबाईल घेण्यासाठी, गाड्या घेण्यासाठी अगदी मैत्रिणीला भेट देण्यासाठी चोऱ्या करतो, तेव्हा शिक्षणाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होते. हे गंभीर आहे. याचा पालकांनी विचार करायला हवा. शिकल्या-सवरल्या तरुणांमधील वाढती गुन्हेगारी हे चिंताजनक आहे. गरीब, कष्टकरी मुलांचा व्हाईट कलर लोक वापर करून घेतात. यातून ते पुढे कट्टर गुन्हेगार होतात आणि शेवटी त्यांचे जीवन उद्ध्वस्त होते. अलीकडील काही वर्षात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. निवृत्त झालेले शिक्षक, प्रतिष्ठित व्यक्ती, व्यापारी यांची ऑनलाईन फसवणूक होते. समाजमाध्यमांचा वापर समाजाच्या हितासाठी करण्यात करणे गरजेचे असताना, तरुणाईकडून मात्र याचा गैरफायदा घेतला जातोय. मोबाईल गेममुळे मुलांना मानसिक संतुलन बिघडलेले दिसून येत आहे. स्मार्ट फोनमुळे वाचनालये ओस पडली. वाचनसंस्कृती लयास जात आहे. अशाप्रकारे त्यांनी पालकांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली.
पोलिसांची भूमिका व्यक्त करताना ते म्हणाले, कायदा आणि व्यवहाराची सांगड घालून पोलिसांना काम करावे लागते. कायद्याची अंमलबजावणी करत असताना माणुसकीचे नाते जपले पाहिजे. वाट चुकलेल्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीसुद्धा पोलिसांची भूमिका महत्त्वाची असते.
यावेळी दत्त नगरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक पी. बी. कुलकर्णी, सुमंत महाजन, माजी नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के, आर. बी. शिंदे, डी. एन. मिरजकर, सुखदा महाजन आदी उपस्थित होते. कवी प्रदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. बी. टी. निकम यांनी आभार मानले.
फाेटाे : १३ शिराळा १