महेश देसाईशिरढोण : कवठेमहांकाळ पंचायत समितीमधील शिक्षण विस्तार अधिकाऱ्यासह एका शिक्षकाचे नावे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन, पैसे मागण्याचा प्रकार सुरु आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी अशा संबंधित खात्यावरुन येणारे संदेश टाळा व कोणालाही पैसे देऊ नका, अशा सूचना केल्या आहेत.पंचायत समिती विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास साबळे व शिक्षक शामजी पाटील व अन्य शिक्षण विभागातील अधिकारी यांच्या नावाने वेगवेळ्या नावे फेसबुक अकाऊंट तयार करुन तातडीच्या पैशांची ऑनलाईन मागणी केली जात आहे. असाच मॅसेज पाहून शामजी पाटील यांच्या एका मित्राने त्या बँक खात्यावर आठ हजार रुपये पाठवले आहेत. विस्तार अधिकारी विश्वास साबळे व शिक्षक शामजी पाटील यांना ही माहिती कळताच त्यांनी पैसे न पाठविण्याचे आवाहन केले.
माझे खाते एक महिन्यापूर्वी हॅक करुन माझ्या नावावर मित्राकडून आठ हजार रुपये घेतले आहेत. याबाबत सांगली पोलीस विभागाच्या सायबर गुन्हे विभागाकडे गुन्हा दाखल करण्यास गेलो असता तेथे कर्मचारी नसल्याचे सांगितले व परत या असे सांगण्यात आले. - शिक्षक शामजी पाटील.
गुरुवारी रात्री च्या सुमारास माझ्या नावाने कोणीतरी फेसबुक खाते काढून आमच्या शिक्षकांना व माझ्या मित्रांकडे पैशांची मागणी केली. मी असा कोणालाही संदेश केला नाही, तरी माझ्या नावाने कोणी पैसे मागितले तर कोणीही देऊ नयेत. - विश्वास साबळे. शिक्षण विस्तार अधिकारी, कवठेमहंकाळ