येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील जय किसान मंडळ आयोजित स्व. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांच्या ३२ व्या स्मृती व्याख्यानमालेत बोलताना डॉ. माणिकराव साळुंखे, जितेश कदम, राजश्री एटम उपस्थित होते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामेरी : शिक्षण हे दशकानुरूप बदलत जाणारी गोष्ट आहे जसा शिक्षणाचा प्रसार होत चालला आहे त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी स्वत:ला बदलून घेऊन रोजगाराच्या संधी शोधल्या पाहिजेत. आजच्या आधुनिक युगात शिकत असताना तंत्रज्ञानाचा वापर हा शिक्षणासाठी मारक ठरतोय की काय अशी देखील भीती एका बाजूला वाटत आहे. माणूस हा युगानुयुगे शिकत असतो शिकण्याला कोणतीच बंधने नसतात, असे प्रतिपादन भारती विद्यापीठचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले.
येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील जय किसान मंडळ आयोजित स्व. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांच्या ३२ व्या स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. जितेश कदम होते तर सत्यजित देशमुख, राजेश्री एटम, बी. एन. पवार, बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी या पाच दिवस चालणाऱ्या या ऑनलाईन व्याख्यानमालेचे उद्घाटन देवराज पाटील यांच्या हस्ते व डॉ. माणिकराव साळुंखे, जितेश कदम, मंडळाचे संस्थापक पं. स. सदस्य आनंदराव पाटील उपस्थित होते.
देवराज पाटील म्हणाले, ३२ वर्षांमध्ये आजपर्यंत अखंडपणे चालत आलेली ही व्याख्यानमाला या कोरोनाच्या काळात देखील जय किसान मंडळाने एक अप्रतिम प्रयोग करत चालू ठेवलेली आहे ही गोष्ट अभिनंदनीय आहे.
डॉ. जितेश कदम म्हणाले, आज इतर देश प्रगत झाले कारण त्यांनी शिक्षण, मनुष्यबळ आणि तंत्रज्ञानाचा योग्यरीतीने वापर केला. जगात अनेक साऱ्या मोठ्या ठिकाणी भारतीय माणूस अभिमानाने कार्यरत आहे परंतु आपल्या शिक्षणाची व्याप्ती आजही आपल्याला वाढवता आलेली नाही.
डॉ. दीपक स्वामी यांनी स्वागत केले. स्वप्निल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कालिदास पाटील यांनी आभार मानले.