लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पोलीस ठाण्यांचे वातावरण प्रसन्न ठेवून प्रशासकीय कारभारात सूत्रबद्धता येण्यासाठी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणी एकाच रंगात रंगवून एकसारख्या फलकांनी सुशोभित करण्यात येत आहेत. शहरातील पोलीस ठाण्यांना यामुळे साज चढला आहे.
एरवी पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तिथल्या रुक्ष वातावरणामुळे तक्रारदाराला आणखी तणाव सहन करावा लागतो. तेथे प्रसन्न वातावरण असावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र स्तरावरूनही पोलीस ठाण्याची रचना, तेथील अधिकारी, कर्मचारी बसण्याची व्यवस्था याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. टेबलवर कापड व काच असावी, पोलिसांच्या खुर्च्या एकसारख्या असाव्यात, यासह जुन्या कागदपत्रांचा ढीग कापडात गुंडाळून न ठेवता तो एकसारख्या बॉक्समध्ये ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस ठाण्यांचे फलकही आता एकसारखे व दोन रंगांमध्ये असणार आहेत. इमारतीबाहेर विद्युत रोषणाई, प्रशस्त प्रवेशद्वार, आतील स्वच्छता याबाबतही प्रयत्न सुरू आहेत.
सांगलीत सांगली शहर, ग्रामीण पोलीस ठाण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ते काम शहरवासीयांचे लक्ष वेधून घेत आहे. सांगली शहर पोलीस ठाण्याचा संपूर्ण परिसर निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुशोभित करण्यात आला आहे. संजयनगर पोलीस ठाण्याचा परिसर वृक्षारोपणाने हिरवागार झाला आहे. ते शहरातील सर्वात नवीन पोलीस ठाणे असल्याने तेथे नव्याने एलईडी दिवे, रंगरंगोटी करण्यात आली आहे.
चौकट
जिल्हाभरात बदलाला सुरुवात
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी ‘माझे पोलीस ठाणे, स्वच्छ-सुंदर पोलीस ठाणे’ यानुसार प्रत्येक अधिकाऱ्याने स्वत:चे ठाणे सुव्यवस्थित ठेवण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार सांगली-मिरज शहरांतील पोलीस ठाण्यांचे काम पूर्ण झाले आहे, तर जिल्ह्यातील इतर ठिकाणची कामे सुरू आहेत.
कोट
पोलीस ठाण्याचा परिसर आणि इमारत अधिक प्रसन्न असावी, यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे तक्रारदारांना अधिक चांगली सेवा देण्यासही मदत होणार आहे. तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांनाही कामाबाबत अधिक बांधिलकी जाणवणार आहे.
- दीक्षित गेडाम, पोलीस अधीक्षक, सांगली.