तोंडोली : जिल्हा व तालुका पातळीवर नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी कार्यक्षम व्यवस्थापन हवे, असे प्रतिपादन भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम यांनी केले. कडेगाव येथील मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयात यु.जी.सी. व महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषदेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘भारतातील नैसर्गिक आपत्ती आणि व्यवस्थापन’ या विषयावरील तीनदिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाच्या माजी अधिष्ठाता डॉ. पी. डब्ल्यु. देशपांडे, महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठाचे भूगोल विभागप्रमुख डॉ. निलाद्री दास, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. एस. डी. कुलकर्णी आदी उपस्थित होते.कदम म्हणाले की, दुष्काळ अतिवृष्टी, भूकंप, भूस्खलन यासारख्या अनेक नैसर्गिक आपत्तींना मानवाला सामोरे जावे लागते. माळीण दुर्घटना हे त्याचेच उदाहरण आहे. त्यासाठी भूगोलशास्त्राचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना केली पाहिजे. या परिषदेत विचारविनिमय होऊन त्याचे निष्कर्ष मांडण्यात यावेत, असे त्यांनी सांगितले.डॉ. पी. डब्ल्यु. देशमुख म्हणाले की, काही आपत्ती नैसर्गिक, तर काही मानवनिर्मित असतात. म्हणून नैसर्गिक आपत्तींचा नेहमी दूरगामी विचार करायला हवा. डॉ. नीलाद्री दास म्हणाले की, भूगोल ही मानवी उत्क्रांतीपासून चालत आलेली एक अभ्यास शाखा आहे. काही दशकांपूर्वी मानवाला कोणत्याही हताशपणे नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत होते. परंतु आजच्या काळात सर्व प्रकारच्या आपत्तींचा अभ्यास करून त्यावर उपाय योजले जात आहेत. म्हणून नैसर्गिक आपत्ती निवारण हा संशोधनाचा अत्यंत महत्त्वाचा व वेगळ्या स्वरूपाचा विषय आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमात भारतातील नैसर्गिक आपत्ती व व्यवस्थापन या विषयावरील निवडक शोधनिबंधांच्या पुस्तकाचे प्रकाशन पतंगराव कदम यांच्याहस्ते झाले. यावेळी डॉ. के. आर. जाधव, डॉ. अर्जुन ननवरे, प्रा. नागराज पाटील यांना आदर्श भूगोल शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी डॉ. पी. जी. सप्तर्षी, डॉ. बी. एन. गोफने, डॉ. जे. सी. मोरे उपस्थित होते. स्वागत डॉ. सौ. एस. डी. कुलकर्णी यांनी केले. (वार्ताहर)
नैसर्गिक आपत्तीवर कार्यक्षम व्यवस्थापन हव
By admin | Published: December 05, 2014 10:18 PM