लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसींचे डोस घेतल्यावर त्याचा कोणताच विपरीत परिणाम होत नसल्याचे केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे; पण याबाबत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत वेगळे आहे. मानवी शरीरावर दुष्परिणाम होत नसला तरी त्याच्या परिणामकारकतेबाबत साशंकता आहे. दोन कंपन्यांच्या लसींचे तंत्रज्ञ भिन्न असते. त्यामुळे एकाच कंपनीच्या लसींचे दोन डोस घेणे फायदेशीर असल्याचे सांगितले जात आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्याबरोबरच लोकांचे जीव वाचविण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. त्यात काही ठिकाणी दोन वेगवेगळ्या कंपनीचे डोस दिल्यानंतरही त्यांचे विपरीत परिणाम झाले नसल्याचे शासनाने स्पष्ट केले. पहिला डोस कोविशिल्डचा आणि दुसरा डोस कोव्हॅक्सिनचा देण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. यात धोका कोणताही नाही; पण दोन कंपन्यांचे लसी बनविण्याचे तंत्रज्ञ वेगवेगळे आहेत. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. त्यात दोन कंपन्यांच्या लसींच्या काॅकटेलबाबत अद्याप अभ्यास झालेला नाही. भविष्यात तसा प्रयोग होऊ शकतो; पण सध्या एकाच कंपनीचे दोन डोस घेणे फायदेशीर आहे. जाणूनबुजून वेगवेगळ्या कंपनीचे डोस घेण्यात काहीच अर्थ नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
चौकट
तज्ज्ञ डाॅक्टर काय म्हणतात..
- जिल्ह्यात दोन वेगवेगळे डोस घेतल्याचे कुठेच समोर आलेले नाही. तसे कोणतेही निर्देश शासनाकडून देण्यात आलेले नाहीत. एकच लस बारा आठवड्यांनंतर घेणे वैज्ञानिकदृष्ट्या फायद्याचे आहे.
- डाॅ. वैभव पाटील, नोडल अधिकारी
-जिल्ह्यात काॅकटेल डोस घेतल्याचे समोर आलेले नाही. वेगवेगळे डोस घेतल्याचा धोका नसला तरी त्याच्या परिणामकारकतेबाबत शंका आहे. त्यादृष्टीने अभ्यास व्हावा.
- डाॅ. रवींद्र ताटे, वैद्यकीय अधिकारी, महापालिका
-एक कंपनीची लस दुसऱ्या कंपनीपेक्षा भारी आहे, असे काहीच नाही. रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याचे तंत्रज्ञ वेगवेगळे आहेत. काॅकटेल लसीबाबत कुठलाच अभ्यास झालेला नाही. जाणूनबुजून असा प्रयोग करू नये. एकाच कंपनीचे डोस घ्यावेत.
- डाॅ. प्रिया प्रभू, शासकीय रुग्णालय, मिरज
चौकट
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण
व्यक्ती पहिला डोस दुसरा डोस
हेल्थकेअर वर्कर २७३७३ १६१८४
फ्रंटलाइन वर्कर ३०१५१ १११७९
१८ ते ४५ वर्षांपर्यंत १६५२९ ०
४५ ते ६० वर्षांपर्यंत २५२४९० ३००४३
६० वर्षांवरील २४८४७६ ६०८२६