संतोष भिसेसांगली : शंभराव्या नाट्य संमेलनाची सांगता रत्नागिरी येथे होत आहे. सांगतेचा रंगारंग सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी पंतप्रधानांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला आहे.सांगलीत गेल्या डिसेंबरमध्ये शंभराव्या नाट्य संमेलनाची नांदी झाल्यानंतर राज्यभरात विभागीय संमेलने कार्यक्रम होत आहेत. सध्या धाराशिवमध्ये विभागीय संमेलनाची तयारी सुरू असून, रत्नागिरी येथे सांगता सोहळा होणार आहे. रत्नागिरीतील संमेलन मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने होत आहे. प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त शरद पवार हेदेखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. परिषदेची पुढील बैठक ऑक्टोबरमध्ये मुंबईत होणार असून, त्यावेळी निश्चित आराखडा तयार केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.गेल्या २९ डिसेंबर रोजी सांगलीत मुहूर्तमेढ व नांदी झाल्यानंतर राज्यभर कार्यक्रम होत आहेत. यादरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काही दिवसांचा खंड पडला. सप्टेंबरमध्ये विधानसभेची आचारसंहिता लागू होण्याची चिन्हे असल्याने पुन्हा विलंब होणार आहे. त्यामुळे रत्नागिरीतील सांगता सोहळा निवडणुकीनंतर डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर, इस्लामपूर, नागपूर, नगरमध्येही कार्यक्रमशंभरावे नाट्यसंमेलन राज्यभर घेण्याच्या परिषदेच्या नियोजनानुसार कोल्हापूर, इस्लामपूर, नागपूर, अहमदनगर येथेही कार्यक्रम होणार आहेत. नागपूर व नगरला विभागीय संमेलने होतील, तर कोल्हापूर, इस्लामपूरला एक-दोन दिवसांचे कार्यक्रम होतील. आतापर्यंत पुणे, पिंपरी-चिंचवड येथेही कार्यक्रम झाले आहेत. मुंबईतही एक-दोन दिवसांचे कार्यक्रम घेण्याचे नियोजन आहे.
रत्नागिरीतील सांगता सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेळ घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोकणातील स्थानिक कलाकारांच्या सहभागाने आठ दिवसांचा हा सांगता सोहळा रंगेल. शंभरावे संमेलन वर्षभर सुरू असून यामध्ये दिवाळी, गणेशोत्सव आणि महाविद्यालयांच्या परीक्षा असा खंड येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपुरातील विभागीय संमेलन रद्द केले तरी चालेल, असाही प्रस्ताव परिषदेला दिला आहे. यापूर्वी ९९वे संमेलन नागपूरला झालेच आहे. -मुकुंद पटवर्धन, कार्यकारिणी सदस्य, नाट्य परिषद