सांगली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात ‘चला, जाणूया नदीला’ महोत्सव साजरा होणार आहे. गांधी जयंतीपासून सुरुवात होईल. याद्वारे राज्यभरातील ७५ नद्यांना अमृत वाहिनी बनविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सांगली जिल्ह्यातील अग्रणी, महाकाली आणि येरळा नद्यांचा त्यात समावेश आहे.बुधवारी मंत्रालयात वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नदी महोत्सवाचा निर्णय झाला. पहिल्या टप्प्यात २६ जानेवारी २०२३ पर्यंत ७५ नद्यांची यात्रा काढण्यात येईल. नदीच्या सद्यस्थितीची माहिती संकलित केली जाईल. त्यांच्या पुनरुज्जीवनाचा आराखडा तयार केला जाईल. नदीसंबंधी काम करणाऱ्या व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांना उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे. नद्या प्रदूषणविरहित आणि बारमाही वाहत्या बनविण्यासाठी आराखडा तयार केला जाणार आहे.यात्रेत प्रत्येक नदीच्या ठिकाणी किमान १०० ते १५० संवर्धक, अभ्यासक एकत्र येतील. नद्यांची सध्याची प्रदूषण स्थिती, वाळू उपसा, अतिक्रमणे, सोडले जाणारे सांडपाणी, पूल व अन्य बांधकामे याच्या नोंदी घेतल्या जातील. नदीचे मूळ जलस्रोत, पुनरुज्जीवनासाठी राबविता येणारे उपक्रम यांचे आराखडे तयार केले जातील. स्थानिक गावकऱ्यांना सहभागासाठी उद्युक्त केले जाईल. आजवर पुनरुज्जीवीत केलेल्या नद्यांना मॉडेल स्वरुपात समोर ठेवले जाईल. त्यासाठी प्रयत्न केलेले कार्यकर्ते व संस्थांची मदत घेतली जाईल. हा संपूर्ण अहवाल शासनासमोर मांडला जाईल. त्यानंतर शासनाकडून पुनरुज्जीवनासाठी निधी मिळण्याची अपेक्षा आहे.
जिल्ह्यातील तीन नद्या
नदी महोत्सवात अग्रणी, येरळा व महाकाली यांचाही समावेश आहे. यातील अग्रणी नदीचे पुनरुज्जीवन जलबिरादरीने केले आहे. तिला मॉडेल स्वरूपात समोर ठेवून काम केले जाणार आहे. तीनही नद्या बारमाही वाहत्या केल्या जातील. येत्या ऑक्टोबरअखेर किंवा नोव्हेंबरमध्ये या नद्यांवर महोत्सव साजरा होणार आहे.