सांगली : खणभागात दोन गटातील भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या महिला पोलिसास दमदाटी आणि धक्काबुक्की केल्याप्रकरणी असिफ बावासह ४० ते ५० लोकांविरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी सोमवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन करून आठ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे.
मोहंजम इसाक बाणदार (वय ३०, रा. नळभाग), सोहेल सिकंदर मुजावर (२८, रा. खणभाग ), इम्रान मुनीर फकीर (३२, रा. मसोबा गल्ली), आरशान जैनुद्दीन मुल्ला (१९), साकीब जैनुद्दीन मुल्ला (२०, दोघे रा. काळा मारुती मंदिरासमोर), फारूख आयुब नगारजी (२९), मोग्या ऊर्फ अशपाक रफिक जमादार (२६, दोघे रा. नगारजी गल्ली), साहील मन्सुर मुल्ला (२५, रा. मकान गल्ली, खणभाग) अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, उर्वरितांचा लवकरच शोध घेतला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास नळभागातील गरीबनवाज मशिदीसमोर दोघांत भांडण सुरू होते. ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर हे भांडण सोडवत होत्या. त्याचदरम्यान संशयित असिफ बावा त्याठिकाणी आला. त्याने या भांडण सोडवणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याशी दमदाटी सुरू केली. त्यामुळे वातावरण बिघडले. त्यातच त्यांनी बेकायदेशीर जमाव गोळा केला. या जमावातील काही लोकांनी या पोलीस महिलेचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, बावाच्या कार्यकर्त्यांच्या शोधासाठी सोमवारी कोम्बिंग ऑपरेशन राबविले. बदाम चौक, नळभाग, काळा मारुती चौक, शेवाळे गल्ली, भांडवले गल्ली तसेच संजयनगर येथील रामरहिम कॉलनीत नाकाबंदी केली. आठ संशयिताना ताब्यात घेण्यात आले. संशयिताना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.