कुपवाड : अहिल्यानगरलगत असलेल्या अष्टविनायक कॉलनीतील आठ घरात शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी घरफोडी केली. सहा घरात चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. परंतु दोन घरातील कुटुंबांना चाकूचा धाक दाखवून व दहशत माजवून २१ हजार रुपयांची घरफोडी केली. याप्रकरणी कुपवाड पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी बारा तासातच चोरट्यांचा शोध घेऊन तिघांना अटक केली.रोहित सुदाम कदम (वय २०), शुभम राजाराम गोसावी (२१), रोहित गणेश गोसावी (२३, तिघेही रा. अहिल्यानगर, कुपवाड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. तिघेही संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
याबाबत माहिती देताना मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीपसिंह गील म्हणाले, कुपवाड-माधवनगर रस्त्यालगत असलेल्या अष्टविनायकनगरमध्ये दोन चाळी आहेत. त्याठिकाणी बाफना इंडस्ट्रीजमधील परप्रांतीय कामगार राहतात.
शुक्रवारी (दि. २९) रात्री अकरा वाजता संशयित रोहित कदम हा चाळीत आला. बबलू पटेल यांच्या खोलीचा कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश करून चाकूचा धाक दाखवत चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या हाती काहीच लागले नाही.कदम याचे आणखी चार ते पाच साथीदार तेथे आले. नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर चोरट्यांनी पळ काढला. त्यानंतर पुन्हा मध्यरात्री दोनच्या सुमारास चौघे चोरटे पुन्हा चाळीत आले. त्यांनी विनोद हरीकिशन निसाद व त्यांचे शेजारी राहणारे गोविंद जयसू राम यांच्या घराची आतून लावलेली कडी काढून घरात प्रवेश केला. घरातील व्यक्तींना चाकूचा धाक दाखवत घरातील रोख आठ हजार रुपये व मोबाईल असा अंदाजे २१ हजार रुपयांची घरफोडी केली.फिर्यादींनी कुपवाड पोलिसात गुन्हा दाखल केल्यावर सहायक निरीक्षक संग्राम शेवाळे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार प्रवीण यादव, नितीन मोरे, कृष्णा गोजारी, सचिन पाटील, महेश गायकवाड यांनी संशयित आरोपींचा तातडीने शोध घेऊन तीन तासात अटक केली.
पोलिसांनी या तिघांची कसून चौकशी केली असता, तिघांनी गांजा व नशेच्या गोळ्यांचे सेवन करून घरफोडी केल्याची कबुली दिली. या घरफोडीतील आणखी एक साथीदार शैलेश पडळकर फरारी असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.दरम्यान, चाळीत अकराच्या सुमारास चोरटे धुमाकूळ घातल असल्याबाबत या भागातील नागरिकांनी एका पोलिसाला रात्री दूरध्वनीवरून संपर्क साधला, मात्र त्यांनी त्यास उत्तर दिले नाही. त्यावेळी सर्तकता दाखवली नाही. त्यामुळे चोरट्यांनी पुन्हा मध्यरात्री धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली.