लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहरामध्ये कोणतेही काम नसताना फिरणाऱ्या रिकामटेकड्यांकडून कोरोनाचा प्रसार होत असल्याचे वास्तव दुसऱ्यादिवशीही समोर आले. विनाकारण फिरणाऱ्यांची तपासणी करण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतल्यावर सोमवारी ९७ जणांमध्ये तिघे, तर मंगळवारी ८७ व्यक्तींच्या तपासणीत शिराळा नाका परिसरात आठ जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले.
शहरामध्ये वाळवा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची रॅपिड अॅंटिजेन टेस्ट करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार महसूल, पोलीस आणि आरोग्य विभागाने संयुक्तपणे ही मोहीम राबविण्यास सोमवारपासून सुरुवात केली.
मंगळवारी सकाळी शिराळा नाका परिसरात आरोग्य विभागाच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने विनाकारण फिरणाऱ्यांची अॅंटिजेन तपासणी करण्याची मोहीम राबविली. त्यामध्ये रेठरेधरण आणि शिवपुरी या गावांतून आलेल्या व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे या चाचणीतून समोर आले. या आठजणांत सांगली येथील एकाचा समावेश आहे. या सर्वांची रवानगी कामेरी रस्त्यावरील कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ. साकेत पाटील यांनी दिली.