सांगली : जिल्ह्यातील ६७ वाळू प्लॉटपैकी १८ वाळू प्लॉटमधील तीनपेक्षा जादा निविदा असलेल्या १० प्लॉटसाठी झालेल्या लिलावातून जिल्हा प्रशासनास ७ कोटी ७० लाख १६ हजार ७५० रुपयांचा महसूल जमा झाला. या लिलावासाठी शुक्रवारी आॅनलाईन पध्दतीने निविदा दाखल करण्यात आलेल्या होत्या. जिल्हा प्रशासनाच्यावतीने रात्री उशिरापर्यंत या निविदा उघडण्याचे काम सुरु होते. शनिवारी जाहीर झालेल्या दहा वाळू प्लॉटच्या आॅनलाईन लिलावातून शासकीय किंमतीपेक्षा अडीच कोटींची जादा रक्कम मिळाली आहे. जिल्ह्यातील वाळू प्लॉटच्या आॅनलाईन लिलाव प्रक्रियेस १७ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली होती. मुंबईतील पर्यावरण समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील वाळू लिलावास समितीच्या सदस्यांनी परवानगी दिली होती. त्यांच्या सूचनेनुसार ही प्रक्रिया राबविण्यात आली आहे. जिल्ह्यात असलेल्या ६९ वाळूचे प्लॉटच्या पाहणीसाठी पर्यावरण समिती जिल्हा दौऱ्यावर आली होती. या पाहणीनंतर ६७ वाळू प्लॉटना समितीने मंजुरी दिली होती. यात जिल्ह्यातील मिरज २५, पलूस १९, वाळवा २२ आणि शिराळा तालुक्यातील एका प्लॉटचा समावेश होता. यातील १८ प्लॉटसाठी निविदा दाखल झाल्या आहेत. या लिलावप्रक्रिया पार पडल्यानंतर ज्या वाळू प्लॉटना तीनपेक्षा अधिक निविदा आल्या आहेत, त्याच वाळू प्लॉटचा लिलाव पार पडला. यात मिरज आणि वाळवा तालुक्यातील प्रत्येकी पाच वाळू प्लॉटचा समावेश आहे. जिल्ह्यातील १० वाळू प्लॉटची प्रशासकीय किंमत व लिलावातून मिळालेली रक्कम पुढीलप्रमाणे : मिरज तालुका हरिपूर -४० लाख ३७ हजार ४६७ रुपये, ४१ लाख ९९ हजार ७८५ रुपये, म्हैसाळ क्रमांक एक - ४७ लाख ७२ हजार ६५० रुपये ४९ लाख १५ हजार ८३१ रुपये, म्हैसाळ क्रमांक दोन- ४७ लाख ७२ हजार ६५० रुपये ४९ लाख १५ हजार ८३१ रुपये, म्हैसाळ क्रमांक तीन ४७ लाख ७२ हजार ६५० रुपये ४९ लाख ६३ हजार ५५८ रुपये, सांगलीवाडी- ३८ लाख ९८ हजार ५६३ रुपये, वाळवा तालुका मसुचीवाडी- ३७ लाख ३१ हजार ६७२ रुपये १ कोटी १२ लाख ९१६ रुपये, बनेवाडी- ५२ लाख २२ हजार ९०० रुपये, मर्दवाडी- ३८ लाख ९९ हजार १६५ रुपये ७५ लाख ६४ हजार ४१३ रुपये, तांबवे- ८३ लाख ४२ हजार २३२ रुपये ८५ लाख ९२ हजार ४९८ रुपये, खरातवाडी- ८६ लाख १० हजार ५० रुपये ८८ लाख ६८ हजार ८९९ रुपये. यासर्व आॅनलाईन पध्दतीने पार पडलेल्या लिलाव प्रक्रियेत मसुचीवाडी येथील वाळू प्लॉटला सर्वाधिक किंमत मिळाली. (प्रतिनिधी)
दहा वाळू प्लॉटचा आठ कोटींना लिलाव
By admin | Published: December 06, 2015 12:33 AM