सांगली : घनकचरा प्रकल्पाअंतर्गत सात कोटी ९१ लाख रुपयांची ६३ नवी वाहने खरेदी करण्यासाठी महापालिकेला राज्य शासनाने शनिवारी मान्यता दिली. त्यामुळे हा प्रकल्प आता ६१ कोटी ३२ लाख रुपयांचा झाला आहे.
या प्रकल्पांतर्गत विविध वाहनांच्या खरेदीसाठी प्रशासनाने शासनाच्या जीएम पोर्टलवर मागणी केली. मात्र, मार्च २०२१ नंतर शासनाने बीएस ४ इंजिन असलेली वाहन खरेदी बंद केली. महापालिकेच्या प्रकल्पात या इंजिनच्या वाहनांचा समावेश होता. त्यामुळे आता बीएस ६ वाहने खरेदी करावी लागणार आहेत. यापूर्वी बीएस ४ प्रकारातील वाहनांसाठी सहा कोटी ६५ लाख खर्च येणार होता. नव्या प्रकारातील वाहन खरेदीसाठी सात कोटी ६३ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यास मंजुरी देण्यात आली.
तत्कालीन काँग्रेसच्या सत्ताकाळात घनकचरा प्रकल्प तयार करण्यात आला होता. भाजपने सत्तेवर आल्यानंतर त्यात बदल केले. त्यामुळे ६० कोटींच्या प्रकल्पास तत्कालीन फडणवीस सरकारने मंजुरीही दिली. त्यानंतर प्रशासनाने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत दोन कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या. यात दैनंदिन साचणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची ४० कोटींची, तर बेडग व समडोळी येथील कचरा डेपोवर साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ३२ कोटींच्या कामांच्या निविदेचा समावेश होता, मात्र निविदा प्रसिद्ध झाल्यावर तत्कालीन सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनेही याला जोरदार विरोध केला. टक्केवारीचे राजकारण झाले. भाजपच्या नेत्यांनी प्रतिष्ठेचा विषय बनविल्याने अखेर तत्कालीन स्थायी समितीने या निविदा मान्यतेसाठी आल्यानंतर ही निविदा प्रक्रिया रद्द करून फेर निविदा काढण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाने यावर शासनाकडे अभिप्राय मागविला असून, अद्याप हा विषय शासन दरबारी प्रलंबित आहे.
चौकट
ही वाहने येणार ताफ्यात
नव्या वाहनांमध्ये ४८ रिक्षा घंटागाड्या, ५ कॉम्पॅक्टर, ४ डंपर प्लेसर, तीन टॅक्टर ट्रीपर, तीन टॅक्ट्रर डोझर या वाहनांचा समावेश आहे. या वाहनांवर आवश्यक असलेल्या वाहनचालकांची मानधनावर भरती करण्यात येणार आहे.